आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. यावरून विधानसभेत आज जोरदार खडाजंगी झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उत्तरही दिले आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले, राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहेत. मात्र, राज्याचे अधिकारी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार असल्याचे म्हणत आहेत. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यावर विचार करण्याची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
यावर उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले की, शिवजयंती साजरी करण्यावरून वाद घालू नये. याआधी आघाडी सरकारच्या काळात संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 निश्चित करण्यात आली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री किल्ले शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी रोजी शासकीय कार्यक्रमात उपस्थित असतात.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाच्या आमदारांनीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले असल्याचे देखील अजित पवार यांनी सांगितले. विधीमंडळाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. ज्यांना अभिवादनासाठी जायचे असेल त्यांनी जाऊन अभिवादन करावे असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.