सिडको : सध्याच्या प्रभाग २५ मधून आता नव्याने पुनरर्चित प्रभाग ३७ मध्ये समाविष्ट झालेल्या सूर्यनारायण चौकातील काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभागांच्या पुनर्रचनेत सध्याचा प्रभाग २५ चा काही भाग नव्या प्रभाग ३७ मध्ये समाविष्ट झाला आहे. असे असले तरी सर्व भागांचा विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. सिडको हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

निवडणुकीत या विभागात प्रभाग आणि सदस्य संख्या वाढल्याने आपल्यासाठी ही जमेची बाजू आहे. प्रभाग ३७ तसेच सिडको आणि महानगरातून शिवसेनेचे जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी, असे आवाहनही बडगुजर यांनी यावेळी केले आहे. प्रभाग ३७ मधून निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेतर्फे दीपक बडगुजर, रत्नमाला राणे, शीतल भामरे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कार्यक्रमास संजय भामरे, सचिन राणे, भूषण राणे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.