शिवसेनेला अंतर्गत सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील बैठकीत शिवसेना खासदारांचा नाराजीचा सूर उमटला आहे. शिवसेना कमकुवत होत चाललीय. शिवसेना मंत्री आपल्याच कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत.उद्धव ठाकरे भेटत नाहीत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्रास दिला जातोय, शिवसेना आमदारांना निधी दिला जात नाहीये. पक्षाला बळकटी दिली नाही तर निवडणूका लढवणे कठीण असल्याचं शिवसेना खासदारांचे म्हणणे आहे.
शिवसेना मंत्री मदत करत नसल्याची खासदारांची तक्रार असल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी मजबूत होत चाललीय आत्ता तरी शिवसेना कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा निवडणूका लढवणे कठीण अशा शब्दात शिवसेना खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचं समोर येत होत. मुख्यमंत्री हे पद शिवसेनेकडे आहे. तर उपमुख्यमंत्री, गृहखाते व महत्वाचे अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर महसूल विभाग काँग्रेसकडे आहे. दरम्यान, कामांसाठी आपल्याला निधीमध्ये डावलले जात असल्याची नाराजी शिवसेना व काँग्रेसमधील आमदारांनी बोलून दाखवली होती.
त्यामुळे, शिवसेनेला अंतर्गत कलहाशी सामना करावा लागत असल्याचे समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला ही अंतर्गत नाराजी महागात पडणार का, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांची समजूत कशी काढणार, या नाराजीचा निवडणुकांवर परिणाम होणार का यासगळ्याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.