साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 25 एप्रिल : आपल्या आईसाठी काहीतरी करुन दाखवणे, तिने केलेल्या कष्टाचे चीज करणे, हे बऱ्याच जणांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सत्यात उतरवायला फक्त मोजक्याच जणांना जमते. अशांपैकीच एक आहे अक्षय लांभाते. एकुलता एक मुलगा असलेल्या अक्षयने त्याच्या शेतमजू असलेल्या आईच्या कष्टांचे सोने केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या वन विभागाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये अक्षयने वनअधिकारी पदाला गवसणी घातली आहे.
पहिल्याच प्रयत्नात यश
तुमच्या शहरातून (पुणे)
अक्षय बाळू लांभाते हा पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीचा रहिवासी आहे. नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या वतीने महाराष्ट्र वन सेवा परीक्षा 2021 पार पडल्या. या परीक्षेत अक्षयने पहिल्याच प्रयत्नात थेट राज्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादीतून 16 व्या क्रमांकाने आणि आरक्षित प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.
जारकरवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला होता. अक्षयचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, जारकरवाडी येथे झाले आहे. गावातीलच आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीला 90 टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. अकरावीत असताना अक्षयच्या वडिलांचे अकाली निधन झाले होते. मात्र घरी एकुलता एक असलेल्या अक्षयला कोणत्याही गोष्टीची कमी त्याच्या आईने पडू दिली नाही.
कसा होता अक्षयचा प्रवास ?
वडिलांचा छत्र हरपल्यानंतर अक्षयवर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे आपल्या आईला आधार देत, त्याने जिद्दीने आपले शिक्षण पूर्ण केले. बारावीत 80 टक्के गुणांसह अक्षय हा तालुक्यात तृतीय आला होता. तर पुढचे इंजिनिअरिंगचे शिक्षण त्याने पुण्याच्या पी. व्ही. जी. कॉलेजमधून घेतले आणि प्रिंटींग इंजिनिअरिंग ही पदवी मिळवली. कॉलेज पूर्ण करून त्याने मुंबई स्थित एका खाजगी कंपनीत दोन वर्षांहून जास्त काळ नोकरी देखील केली.
MPSC RFO Exam : दिवगंत वडिलांचं स्वप्न पूर्ण! आईच्या कष्टाचं चीज करत मोना राज्यात तिसरी, पाहा Video
नोकरी सोडून मिळवले यश
नोकरीचा राजीनामा देऊन पुर्णवेळ हा अभ्यासासाठीच दिला होता. 2021 ची राज्यसेवा परीक्षा देखील मी उत्तीर्ण झालो आणि वनसेवा परीक्षा देखील मी उत्तीर्ण झालो. योग्य अभ्यास आणि नियोजनामुळेच मी माझ्या पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी परीक्षेत यश मिळवले. आईने जे काही काबाडकष्ट आजवर केले आहेत, त्यामुळेच मी इथवर पोहोचू शकलो, असे अक्षय लांभाते सांगतो.
दरम्यान अक्षयला त्याच्या शिक्षणासाठी पुणे येथील फ्रेंड्स ऑफ चिल्ड्रन, जैन सोशल ग्रुप एज्युकॉन, सायबेज खूशबू ट्रस्ट अशा संस्थांचा मोठे सहाय्य लाभले आहे, असेही अक्षयने स्पष्ट केले आहे. तर आपल्या कष्टकरी आईला चांगले दिवस दाखवण्यासाठी अक्षयने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.