मुंबई, 26 एप्रिल- ‘शोले’ हा भारतीय सिनेसृष्टीतील एक असा सिनेमा आहे जो इतक्या वर्षानंतर आजही प्रेक्षकांना पाहायला तितकाच आवडतो. हा सिनेमा पाहून लोक कधीही कंटाळत नाहीत. 1999 मध्ये बीबीसीच्या सर्वेक्षणात ‘शोले’ चित्रपटाचं वर्णन ‘फिल्म ऑफ द मिलेनियम’ असं करण्यात आलं होतं. हा चित्रपट मुंबईतील मिनावरा थिएटरमध्ये सलग 5 वर्षे (1975-1980) सुरु होता. 1975 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या शोले या चित्रपटाने बॉलिवूडचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने इतके विक्रम रचले आहेत की, आजही अनेक चित्रपटांनी शेकडो कोटींची कमाई करुनही मोडलेले नाहीत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शोले चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहे सुनसान झाली होती.
हा सिनेमा फ्लॉप घोषित होण्याच्या मार्गावर होता. तेव्हाच कथेचे लेखक सलीम-जावेद यांना एक भन्नाट युक्ती सुचली होती.सलीम जावेदने एक युक्ती केली आणि या चित्रपटाचं भविष्यच बदललं. पुढे या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये अनेक इतिहास रचले. जे आजतागायत कोणी मोडू शकले नाहीत.
1975 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट अवघ्या 3 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. नंतर या चित्रपटाने जगभरात 50 कोटींची कमाई केली. तसेच या चित्रपटाने असा इतिहास रचला होता की, आजही त्यातील अनेक विक्रम नवीन चित्रपटांनी मोडलेले नाहीत. या चित्रपटाने आणखी एक विक्रम नोंदवला आहे. या चित्रपटाची कथा लिहिणाऱ्या लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीलाही 10,000 रुपये फी देण्यात आली होती. हा देखील त्यावेळी एक विक्रम होता. स्वतः जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली होती.
जावेद यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, ‘हे खरं आहे की, रिलीजनंतर चित्रपटाचे रिव्ह्यू चांगले आले होते. पण त्यानंतरही चित्रपटाचे अनेक स्पेशल इफेक्ट्स थिएटरमध्ये दिसले नाहीत. पण मला आणि सलीम साहेबांना चित्रपटाबद्दल खूप विश्वास होता. आम्ही एक शक्कल लढवली आणि वर्तमानपत्रात जाहिरात दिली की, चित्रपट प्रत्येक प्रदेशातून 1 कोटी कमावत आहे. हा आकडा तितकासा चांगला नसला तरी, त्याचा चांगला परिणामही आम्हाला पाहायला मिळत होता. चित्रपटासाठी आपण अशी जाहिरात दिल्याचं जावेद यांनी उघड केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.