धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 7 एप्रिल : मैद्यापासून तयार होणारा मालपुआ हा एक हटके असा पदार्थ आहे. जगन्नाथच्या प्रसादापासून ते मुस्लीम बांधवांच्या इफ्तारापर्यंत सर्वमान्यता मिळालेली ही एकमेव मिठाई असेल. यापूर्वी फारसा न मिळणारा हा पदार्थ याची लोकप्रियता वाढल्यानं आता अनेक ठिकाणी मिळतो. मुंबईतील कुर्ला भागातील मालपुआ हा विशेष प्रसिद्ध आहे. विशेषत: रमजान महिन्यात इथं चांगलीच गर्दी होते. कुर्ल्यासह संपूर्ण मुंबईत फेमस असलेला हा मालपुआ कसा तयार होतो हे पाहूया
रमजानमध्ये मालपुआचं विशेष महत्त्व आहे. मुस्लिम बांधव जेवणं झाल्यावर गोड पदार्थ म्हणून मालपुआ खाण्यास जास्त पसंद करतात. कुर्ल्यातील न्यू आझाद रेस्टॉरंट समोर शकील अहमद गेल्या 12 वर्षांपासून मालपुआ बनवीत आहे. एक अंड्याचं स्पेशल, दोन अंड्याचं स्पेशल, राजधानी आणि ड्रायफ्रूट मालपुआ सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूट, मावा, रबडी, मलाई, अंडे याचा वापर करून मालपुआ तयार केला जातो. याची किंमत 150 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मालपुआ कसा तयार करतात?
साहित्य – खवा, दूध, मैदा पीठ, अंडे, साखर, मलाई, पाणी, तूप पदार्थ सजविण्यासाठी ड्रायफ्रूट.
कृती : एका भांड्यात खवा घ्या. त्यामध्ये दूध घालून दोन्ही पदार्थ चांगल्याने मिसळून घ्या. त्यानंतर खव्यामध्ये दूध चांगल्यारितीने मिक्स झाल्यानंतर मैदा घाला. त्यानंतर याला व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. या मिश्रणामध्ये एकही गुठळी तयार होऊ नये याची काळजी घ्या. त्यानंतर याला काही वेळासाठी झाकून ठेवा. एका खोलगट भांड्यात तूप घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्या. त्यामध्ये आधीच तयार केलेल मिश्रण गोलाकार करून थोडे थोडे टाका. मंद आचेवर त्याला तळून घ्या. तसेच त्याचा सोनेरी रंग आल्यानंतर त्याला बाहेर काढून थंड करा. सर्व मालपुआ तयार झाल्यानंतर त्यावर मलाई आणि ड्रायफ्रूट टाकून तुमचा टेस्टी मालपुआ खाण्यासाठी तयार असेल.
रमजानमध्ये मोहम्मद अली रोडला जायलाच हवं, खवय्यांच्या आवडत्या जागेचे पाहा खास Photos
‘रमजान महिन्यात दिवसभर उपवास ठेवतो आणि उपास सोडल्यानंतर काहीतरी गोड पदार्थ लागतो. गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अंगातील अशक्तपणा कमी होतो. म्हणून लोक मालपुआ खातात.’ असं ग्राहक अमीर हुसैन कुरेशी यांनी सांगितलं.
कुर्ल्यातील न्यू आझाद इंडियन रेस्टॉरंटच्या समोर मिळणारा मालपुआ प्रसिद्ध आहे. ड्रायफ्रूट आणि राजधानी मालपुआ या ठिकाणची खासियत आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी या ठिकाणचा मालपुआ खात आहे. मित्र मंडळ रमजानमधील भेटण्याचं आमचं हे ठिकाणही आहे, असं कुरेशी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.