प्रमोद पाटील, नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी सानपाडा रेल्वे स्थानकाच्या मधील रुळावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. वाशी लोहमार्ग पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि मृत तरुणाच्या डोक्यावर कुणीतरी जोरात दगड मारून खून केला असावा, असा अंदाज बांधला. त्याच दिशेने तपास सुरू केला असता पोलिसांना या घटनेची उकल करण्यात यश मिळालं.
एका गुप्त माहितीच्या आधारे आणि तांत्रिक बाबी तपासून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कसून चौकशीत सदरचा खून पूर्ववैमनस्यातून केल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे जवळच्या मित्रानेच तरुणाचा खून केला असल्याचं यात समोर आलं. मागील दोन वर्षापूर्वी 23 वर्षीय मयत जितेश बनसोडे याने त्याचाच मित्र असलेला 26 वर्षीय आरोपी राजू खरटमल याला मारहाण केली होती.
तुमच्या शहरातून (मुंबई)
याच गोष्टीचा राग राजूने मनात ठेवला होता. त्याचाच राग मनात धरत त्याने आणि त्याच्या एका 17 वर्षीय अल्पवयीन साथीदाराने जितेश बनसोडे याला रेल्वे रुळावर नेऊन दगडांनी जबर मारहाण केली. यातच जितेश ठार झाल्याचं चौकशीत निष्पन्न झालं.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातील एकाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर घटनेतील अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून करण्यात आलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासात या खुनाचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.