पुणे, 17 मे : गेल्या आठवड्यात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला. या प्रकरणावर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गटाला पहिला धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महेश पासलकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.
शिंदे गटात प्रवेश करणार
महेश पासलकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. सत्तासंघार्षाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात ठाकरे गटाला हा धक्का बसला आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर महेश पासलकर यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
तुमच्या शहरातून (पुणे)
राऊतांवर आरोप
पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही. या उलट ठाकरे गटाचे फोटो वापरून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढवल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा आपल्याला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस, राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे व्यथित होऊन पक्षाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.