बँगलोर, 10 मे : कर्नाटक विधानसभा निवणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यानंतर आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. C-Voter, Lokniti-CSDS, Axis My India आणि Today’s Chanakya ने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात बुधवारी संध्याकाळी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. या महापोलच्या अंदाजावरून राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची लढत झाली असली तरी दोन्ही पक्षांना बहुमताचा जादुई आकडा पार करता येणार नाही, हे अगदी स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, राज्यातील तिसरा मोठा पक्ष जेडीएस येथे किंगमेकरची भूमिका बजावू शकतो.
राज्यातील एकूण 224 विधानसभा जागांवर 2615 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, त्यापैकी 2430 पुरुष आणि 184 महिला आहेत तर एक उमेदवार तृतीयपंथीय आहे. राज्यातील एकूण 5.31 कोटी मतदारांनी बटण दाबल्यानंतर या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
कर्नाटकच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर 1985 च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही सत्ताधारी पक्षाला सलग दुसऱ्यांदा जनसमर्थन मिळू शकलेले नाही. गेल्या 38 वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडीत काढण्यासाठी सत्ताधारी भाजपने जोर लावला आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र सत्ताविरोधी लाट आणि निवडणूक आश्वासनांच्या जोरावर प्रचंड जनसमर्थन यांच्या जोरावर पूर्ण बहुमताचा दावा करत आहे. आता कोणाच्या दाव्यात किती ताकद आहे, हे 13 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
कर्नाटकच्या 224 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी किमान 113 सदस्यांची आवश्यकता असेल. राज्यातील एकूण जागांपैकी 36 अनुसूचित जाती (SC) आणि 15 अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव आहेत.
यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक निवडणुकीत 222 मतदारसंघांसह 72.13 टक्के मतदान झाले होते, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक 104 जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक होता.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी पार पडले आणि आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येथे 65.69% मतदान झाले. राज्याच्या रामनगर जिल्ह्यात सर्वाधिक 78.22% मतदान झाले, तर सर्वात कमी मतदान बेंगळुरू शहरातील काही भागांमध्ये 48.63% नोंदवले गेले.
TV 9 Bharatvarsh-Polstrat– टीवी 9 भारतवर्ष-पोलस्टाटनुसार, कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळू शकते. काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळतील, तर भाजपला 88 ते 98 जागा मिळतील असा अंदाज आहे. जेडीएसबद्दल बोलायचे झाले तर पक्षाला 21 ते 26 जागा मिळू शकतात. इतरांना त्यांच्या खात्यात शून्य ते 4 जागा मिळू शकतात.
ABP C-VOTER: एबीपी आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला आघाडी मिळू शकते. काँग्रेसला 100 ते 112 जागा मिळू शकतात, तर भाजपला 83 ते 95 जागा मिळू शकतात. जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.
ZEE NEWS MATRIZE- झी न्यूज आणि मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसचे सरकार बनू शकते. काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळू शकतात, तर भाजपला 79 ते 94 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला 25 ते 33 जागा मिळू शकतात. इतरांना दोन ते पाच जागा मिळू शकतात.
Republic TV- P MARQ- PMARQ च्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेसला आघाडी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 94 ते 108 जागा मिळू शकतात, तर भाजपला 85 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला 24 ते 32 जागा मिळू शकतात, तर इतरांना 2 ते 6 जागा मिळू शकतात.
Jan Ki Baat- जन की बातच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला 94 ते 117 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 91 ते 106 जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएला 14 ते 24 जागा मिळू शकतात आणि इतरांना शून्य ते 2 जागा मिळू शकतात.
Navbharat- नवभारतच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात काँग्रेसला आघाडी मिळू शकते. काँग्रेसला 106 ते 120, भाजपला 78 ते 92, जेडीएसला 20 ते 26 आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळू शकतात.
Times Now- टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेसला 113 जागा मिळू शकतात. तर भाजपला 85, जेडीएसला 23 आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
INDIA TV – CNX– इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 110 ते 120 जागा, भाजपला 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जेडीएसला 20 ते 24 जागा मिळू शकतात आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.