अज़हर खान, प्रतिनिधी
सिवनी, 1 मे : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांकडे पैशांसाठी बळजबरी करत असल्याने वडिलांनी आपल्या मुलाला पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण –
55 वर्षीय बैसाखू उईके याने आपला मुलगा महेश उईके (28) याला 22 एप्रिल 2023 रोजी सिवनी येथील बारघाट पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या घिसी गावात पेट्रोल टाकून जाळले. या घटनेत महेश गंभीर भाजला. त्याला आधी बारघाट रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सिवनी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पंचनामा करत महेशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. तसेच पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
एसडीओपी बारघाट शशिकांत सरीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी योजनेची काही रक्कम आरोपी वडील बैसाखूच्या खात्यात जमा करण्यात आली होती. त्यामुळे महेश हा वडील बैसाखू यांच्याकडे त्या रकमेची मागणी करत होता. यावरून पिता-पुत्रांमध्ये जोरदार वाद झाला. मात्र, या वादाचे रुपांतर भयानक घटनेत घडले. वडील बैसाखू उईके याने मुलगा महेश उईके याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळले.
यानंतर जखमी महेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध 307 चा गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करून कारागृहात रवानगी केली. त्यानंतर जखमी मुलगा महेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.