मुंबई, 24 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये सोमवारी 34 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजीत सलग फ्लॉप ठरत असलेला स्टार युवा फलंदाज पृथ्वी शॉला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत तब्बल 6 सामने खेळले असून यातील केवळ एका सामन्यात विजय मिळवला. मागील 6 सामन्यांमध्ये कर्णधार डेव्हीड वॉर्नर सह पृथ्वी शॉला दिल्लीसाठी ओपनिंग फलंदाज म्हणून कामगिरी करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु या सर्व सामन्यांमध्ये पृथ्वीची कामगिरी निराशाजनक ठरली. पृथ्वीने आयपीएल 2023 मधील 6 सामन्यात दिल्लीकडून खेळताना केवळ 45 धावा केल्या. गेल्या 6 सामन्यांमध्ये त्याची सर्वोत्तम खेळी 15 धावांची होती, जी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळली गेली होती. उर्वरित सर्व सामन्यांमध्ये तो खराब फॉर्मशी झुंजताना पाहायला मिळाला.
6 सामन्यांमध्ये पृथ्वी शॉचा स्कोअर 12, 7, 0, 15, 0 , 13 असा होता. दिल्ली कपिटल्सने त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी अनेक संधी दिल्या परंतु तरी देखील त्याची कामगिरी न सुधारल्याने अखेर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैद्राबाद विरुद्धच्या सामन्यात पृथ्वीला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. केवळ प्लेईंग 11 मधूनच नाही तर राखीव खेळाडूंमध्ये देखील पृथ्वीला स्थान देण्यात आले नाही. पृथ्वी शॉच्या जागी दिल्ली संघात सरफराज खानला संधी देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.