विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 12 मे: सध्या सर्वत्र शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून बच्चे कंपनी मध्ये धमाल मस्तीचा माहोल आहे. या दिवसांत शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त एखादी कला, छंद अथवा मैदानी खेळ इत्यादींची शिकवणी लावण्यासाठी पालकांची मुभा असते. या दिवसांत जलतरण तलावात पोहायला शिकण्याकडे अनेकांचा कल असतो. आपण देखील आपल्या मुलांना जलतरण तलावात स्विमिंग क्लासेस लावण्याच्या विचारात असाल तर त्यापूर्वी काही बारीक सारीक मात्र महत्त्वपूर्ण गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं.
जलतरण तलावात जाण्याआधी हे पाहा
तुमच्या शहरातून (नागपूर)
हल्ली उन्हाळी सुट्ट्यांचे दिवस आहेत आणि दिवसा उष्णतेचा पारा देखील चांगलाच तापतो आहे. अशावेळी लहान बाल-गोपालांपासून ते अगदी थोरा – मोठ्यापर्यंत जलतरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण गर्दी करत असतात. मात्र या जलतरणाच्या आनंदा सोबतच काही मूलभूत बाबी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत. जो प्रमाणित जलतरण तलाव आहे तिथे जलशुद्धीकरण केंद्र आहे की नाही हे पालकांनी अथवा जलतरणपटूनी तपासले पाहिजे. या तलावात जल शुद्धीकरणासाठी क्लोरीन वापरतात. तसेच पाणी फिल्टर प्लांट मध्ये जाऊन परत फिल्टर होऊन तलावात येत असते. अशावेळी जलतरण तलाव चालवणाऱ्या संचालकांनी योग्य वेळेत वॉटर बॅक वॉश दिले पाहिजे. जेणेकरून पाण्याची गुणवत्ता आणि पाण्याची शुद्धता टिकून राहील, अशी माहिती जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांनी दिली.
जलतरणपटूंनी घ्यावी काळजी
जलतरण तलावात येणाऱ्या ग्राहक, प्रेक्षक आणि जलतरणपटूंनी देखील घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जलतरणपटूंनी पोहण्यापूर्वी व पोहून झाल्यानंतर शॉवर खाली अंघोळ करायला पाहिजे. तसेच पाण्यात उतरताना कुठलेही बॉडी लोशन, ऑईल, क्रम तस्यम गोष्टीचा वापर टाळला पाहिजे. तसेच जलतरणाच्या वेळी जलतरणाचेच कपडे, डोक्यात टोपी, चष्मा इत्यादींचा वापर केला पाहिजे. अशा गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता आणि शुद्धता टिकण्यास मदत होते आणि आपल्यासह इतरांना देखील कुठल्याही त्रासा शिवाय जलतरणाचा आनंद घेता येतो.
सोलापूरच्या छोट्या कार्तिकने लावला भन्नाट शोध, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तुम्हीही कराल कौतुक
पोहणे आत्मसंरक्षणाचा भाग
विदेशात प्रत्येक व्यक्तीला नागरी संरक्षणाचे धडे बालपणातच देतात. मात्र आपल्याकडे क्वचितच असे चित्र बघायला मिळते. पोहणे हा केवळ एक क्रीडा प्रकार नसून तो शारीरिक, मानसिक आणि प्रसंगी आत्मसंरक्षणाचा एक भाग आहे. पाण्यात पोहता येणे एक महत्वपूर्ण बाब आहे. जलतरणाचे धडे घेण्यासाठी आपण ज्या प्रशिक्षकाकडे पोहणे शिकणार आहोत त्याची पात्रता, अनुभव आणि जलतरण क्षेत्रातले काही बेसिक कोर्स केले आहे का हे तपासले पाहिजे. बऱ्याचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने एखादा अपघात झाल्यास त्यावर त्वरित उपाय एक उत्तम प्रशिक्षकाकडे असतो. पाण्यात पोहणे शिकवणे जितके महत्त्वाचे आहे त्याच तोडीचे पाण्यातून इतरांना वाचवणे हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे या बारीक सारीक मात्र महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत प्रशिक्षक बाटवे यांनी बोलताना व्यक्त केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.