मुंबई 15 एप्रिल : देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. एका दिवसात 10 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाबाबत अचूक भाकीत करणाऱ्या कानपूर आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दावा केला आहे, की मे महिन्याच्या मध्यात कोरोना शिगेला पोहोचेल. त्यादरम्यान प्रत्येक दिवसाला 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळू शकतात.
गणितीय मॉडेलच्या आधारे डॉ. मनिंद्र अग्रवाल यांनी केलेलं भाकीत संपूर्ण देशात सर्वात अचूक असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा परिस्थितीत, गेल्या काही दिवसांच्या अभ्यासाच्या आधारे, आयआयटीचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल म्हणतात की मे महिन्याच्या मध्यात कोरोनाचा उच्चांक दिसू शकतो. या गणितीय मॉडेलच्या आधारे मे महिन्याच्या मध्यापासून दररोज 50 ते 60 हजार प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे.
मनिंद्र अग्रवाल गणितीय मॉडेल सूत्राच्या आधारे ही माहिती देतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार ते म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढण्याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे लोकांमधील नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होत आहे. जेव्हा संसर्ग होतो तेव्हा शरीरात विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित होते. लोकांमध्ये व्हायरसशी लढण्याची ही क्षमता पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय दुसरं कारण म्हणजे कोविड-19 चे नवीन प्रकार, जे आधीच्या प्रकारापेक्षा वेगाने पसरत आहे. याच कारणांमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.
प्रोफेसर अग्रवाल म्हणतात, की देशातील 90 टक्के लोकांमध्ये आणि उत्तर प्रदेशातील 95 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. मॉडेलनुसार, मे महिन्याच्या मध्यात कोरोनाची प्रकरणं दररोज 50,000 च्या आसपास होतील, जी इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशासाठी मोठी गोष्ट नाही. तसंच, लोकांना होत असलेला संसर्गदेखील फार धोकादायक नाही. सर्दी, खोकला या लक्षणांवर लोकांना घरबसल्या उपचार घेता येतील. अशा परिस्थितीत, कोविड-19 ला सामान्य फ्लूप्रमाणेच हाताळलं पाहिजं.
22 देशांमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या खतरनाक व्हेरिएंटची भारतात एन्ट्री; लक्षणंही अतिशय वेगळी
कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत, तेव्हा पुन्हा नवी लाट येणार की काय, अशी भीतीही बळावली आहे. मात्र, याबाबत आताच काही सांगता येणार नाही. सध्या घाबरून जाण्याची गरज नाही, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसल्याचं त्यांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.