मुंबई, 18 मे : देशाच्या सीमावर्ती भागातली सुरक्षा राखण्याचं काम सीमा सुरक्षा दल करतं. ही संस्था केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा एक भाग आहे. सध्या सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ही भरती कायदे अधिकारी या पदासाठी होणार आहे. बीएसएफमध्ये यासाठीच्या 6 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 12 जून 2023पर्यंत त्यांचे अर्ज पाठवू शकतात.
सीमा सुरक्षा दलामध्ये कायदा अधिकारी ग्रेड-3/डेप्युटी कमांडंट या पदासाठी 6 जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी 5 जागा खुल्या प्रवर्गासाठी असतील, तर 1 ओबीसीसाठी आरक्षित असेल. या पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेमधून घेतलेली कायद्यातली पदवी असावी. तसंच वकील म्हणून 7 वर्षांचा अनुभव असावा. तसंच उमेदवारांकडे कायद्यातली पदव्युत्तर पदवी असेल, तर वकील म्हणून काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव असावा. सशस्त्र दलांशी संबंधित विशेष कायद्यांतर्गत, तसंच त्याच्याशी संबंधित न्यायालयीन खटले लढण्याचा 2 वर्षांचा अनुभव असेल, तर अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 40 वर्षांपेक्षा कमी असावं असं बीएसएफने म्हटलं आहे. अर्ज पाठवलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, कागदपत्रं पडताळणी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट व वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना अर्ज भरताना 400 रुपयांची फी भरावी लागेल. हे पैसे नेट बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे किंवा अधिकृत कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे भरता येतील. बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येईल. ही पदभरती 14 मे 2023 पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना 12 जून 2023 पर्यंत त्यांचे अर्ज पाठवता येतील. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणीच्या 11व्या पातळीनुसार (67700 रुपये-208700 रुपये) मासिक वेतन मिळेल.
वाचा – सेंट्रल बँक ऑफ इंडियात `या` पदांसाठी भरती सुरू, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर
देशाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा अनेकांना असते. संरक्षण क्षेत्राचा विस्तार खूप मोठा आहे. त्यात विविध पदं सांभाळावी लागतात. त्यानुसार सीमा सुरक्षा दलामध्ये सध्या कायदे अधिकारी या पदासाठी नोकरभरती सुरू आहे. या पदासाठीच्या 6 जागांसाठी इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात; मात्र कायदा क्षेत्रातलं शिक्षण व अनुभव त्यासाठी गरजेचा आहे. पात्र उमेदवारांना वेतनही उत्तम मिळू शकेल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.