नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (16 एप्रिल) दिल्लीत अचानक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पक्षाचे बडे नेते 10 जनपथवर पोहोचले आहेत. या बैठकीत सध्याची राजकीय परिस्थिती तसेच आगामी विधानसभा निवडणुका या विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
काँग्रेस नेते अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन हे पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल, यांच्यासह रणनीतीकार प्रशांत किशोर देखील उपस्थित आहेत. ”सोनिया गांधी यांनी तातडीची बैठक बोलावली त्यावेळी मी बंगलोरला होतो. याबाबत मला माहिती देण्यात आली. तसेच बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले, असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातून सरकारवर निशाणा साधला, ”आज आपल्या देशात द्वेष, कट्टरता आणि असहिष्णुतेचे वातावरण आहे. आता हे थांबवले नाही तर ते नियंत्रणाबाहेर जाईल, असे म्हणत सोनिया गांधी यांनी केंद् सरकारवर निशाणा साधला आहे.तर, यापूर्वी पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेसच्या दिग्गजांनी 5 तास बैठकीत विचारमंथन केले. आपला उद्देश काय आहे आणि आम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवायला हवे, हे स्पष्ट व्हायला हवे, असे राहुल गांधी यांनी बैठकीत सांगितले होते.
तसेच, वेगवेगळ्या राज्यांसाठी वेगवेगळी रणनीती बनवायला हवी, भाजप आपल्या स्वार्थासाठी निवडणूक लढवत आहे. तर आम्ही पारंपरिक पद्धतीने लढत आहोत. आपण पक्ष म्हणून लढले पाहिजे, उमेदवार म्हणून नाही. आपण काँग्रेस पक्ष म्हणून महात्मा गांधी, नेहरू, पटेल यांच्या तत्त्वांचे पालन करतो आणि आम्ही संपूर्ण देशासाठी लढतो. पण काही राजकीय पक्ष आपापल्या विशिष्ट ध्येयांसाठी लढत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.