● बसेस बंद, परीक्षा केंद्रावर उमेदवार कसे पोहचणार?
● बेरोजगारांच्या जिवाशी खेळ कशासाठी?
नागपूर :- राज्यातील तणावपूर्ण वातावरण पाहता राज्य परिवहन महामंडळाने अनेक भागात बससेवा बंद ठेवली असल्याने सोमवारी होणार्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही, याचा विचार करता शासनाने सोमवारी होणारी परीक्षा लांबणीवर टाकून बेराजगार उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेण्याचे त्यांनी सूचित केले आहे.
मराठा आरक्षणाची मागणी करणार्या आंदोलकांवर जालन्यातील अंतरवाली सराटी गावात लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाकडून खबरदारी म्हणून मराठवाड्यात जाणाऱ्या शेकडो बसेस रद्द केल्या आहेत. तसेच राज्यातील काही भागांतही बससेवा बंद आहे. अशा परिस्थितीत तलाठी पदाच्या परीक्षेस बसणार्या उमेदवारांना आदल्या दिवशी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार कसे उपस्थित राहणार? आदल्या दिवशी उपस्थित राहिल्यावर उमेदवारांनी राहण्याची, जेवणाची व्यवस्था कशी करायची? याचा विचार शासनाने केला नाही.
मराठवाड्यात तणावपूर्ण वातावरण आहे. त्यातच उमेदवारांना आदल्या दिवशी संभाजीनगर परीक्षा केंद्रांवर जाण्यास सांगितले आहे. बस बंद असताना कसे पोहचणार तिथे उमेदवार? आंदोलन, तणावपूर्ण परिस्थिती, बसेस बंद असल्याने सोमवारी होणारी परीक्षा लाबणीवर टाकली, तर काय बिघडणार आहे? शासन बेरोजगारांच्या जिवाशी असं का खेळत आहे? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केले आहेत. परीक्षा लांबणीवर टाकून बेरोजगारांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.