प्रमोद पाटील, नवी मुंबई 06 एप्रिल : सिडको महामंडळाने महागृहनिर्माण योजनेंतर्गत सन 2018 ते 2022 मध्ये काढलेल्या सोडतीतील विजेत्या अर्जदारांनी एकही हप्ता भरला नाही किंवा काही हप्त्यांचा भरणा केला आहे, अशा अर्जदारांकडून हप्ता भरण्यास मुदतवाढीसाठी विनंती करण्यात येत होती. यानंतर आता “प्रधानमंत्री आवास योजनेतील “सर्वांसाठी घरे” या “सिडको महागृहनिर्माण योजनांतील सदनिकेचे हप्ते न भरलेल्या अर्जदारांकरिता सिडकोतर्फे अभय योजना सादर करण्यात येत आहे.
सिडकोच्या संचालक मंडळाने सदर अर्जदारांना अंतिम संधी म्हणून 30 एप्रिलपर्यंत हप्त्यापोटी शिल्लक रकमेचा भरणा करण्यासाठी विलंब शुल्कात सवलत देण्याबाबत अभय योजनेस मान्यता दिली आहे. अभय योजनेंतर्गत विहित मुदतीत हप्त्यांचा भरणा करणाऱ्या अर्जदारांना विलंब शुल्कात सवलत मिळणार आहे.
मुंबईतल्या एअर इंडियाच्या इमारतीची होणार विक्री, महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
तुमच्या शहरातून (मुंबई)
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या सिडकोने अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील आहेत, या बाबीचा विचार केला. यामुळे त्यांचे घराचे स्वप्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण व्हावे याकरिता अभय योजनेच्या रूपाने त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सदर अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरी अधिकाधिक अर्जदारांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन सिडकोने केलं आहे.
काय आहे अभय योजना –
या योजनेनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील थकीत अर्जदार 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, अशा अर्जदारांचे विलंब शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येतील.
दुसरं म्हणजे अल्प उत्पन्न गटातील अर्जदार 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण रकमेचा भरणा करतील, त्यांच्या एकूण विलंब शुल्कातील 25 टक्के शुल्क माफ होईल.
30 एप्रिलपर्यंत म्हणजेच वाढीव मुदतीत एकही हप्ते भरणा न केलेल्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द करण्यात येईल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांनी कमीत कमी एका हप्त्याचा भरणा केला असेल, त्यांना 31 मेपर्यंत विलंब शुल्कासह उर्वरित हप्त्यांचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.