चेन्नई, 18 एप्रिल : आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात धावांचा पाऊस पडला. मात्र या सामन्यात चर्चा झाली ती हर्षल पटेलची. 20वे षटक सुरू असताना आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंचांनी त्याचं षटक पूर्ण करू दिलं नाही. त्याचं षटक ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केलं. सामन्यावेळी हर्षल पटेलने लागोपाठ दोन बीमर चेंडू टाकल्यानं पंचांनी असा निर्णय घेतला.
आयसीसीच्या नियमानुसार एखादा गोलंदाज दोन चेंडू कमरेपेक्षा जास्त उंचीवर टाकत असेल तर त्याला धोकादायक श्रेणीतील गोलंदाजी समजली जाते. अशा वेळी पंच गोलंदाजांची गोलंदाजी काढून घेऊ शकतात. चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी हर्षल पटेलने सलग दोन वेळा अशी चूक केली आणि त्याचा परिणाम पंचांनी त्याच्यावर कारवाई केली.
कोहली-गांगुली वाद मैदानापासून ते सोशल मीडियापर्यंत, आता रंगली नवी चर्चा
हर्षल पटेल 20वे षटक टाकत असताना मोईन अली आणि रविंद्र जडेजा फलंदाजी करत होते. दुसऱ्या चेंडूवर मोईन अलीला हर्षल पटेलने कमरेच्या वर चेंडू टाकला. यानंतर तिसरा चेंडू पुन्हा तसाच टाकला. त्यावेळी कर्णधार फाफ डु प्लेसिस मैदानावर नव्हता. अशा परिस्थितीत पंचांनी आरसीबीचं नेतृत्व करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला हर्षल पटेलची गोलंदाजी थांबवण्यास सांगितलं.
पंचांनी सांगितल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने स्वत:च चेंडू हाती घेत षटक पूर्ण केलं. या षटकात तिसऱ्या चेंडूवर षटकार गेला. तर चौथ्या चेंडूवर जडेजा बाद झाला. हर्षल पटेलला सामन्यात एकच विकेट मिळाली. त्याने डेवॉन कॉनवेला बाद केलं. 3.2 षटके गोलंदाजी करताना 10 पेक्षा अधिक इकॉनॉमी रेटने त्यानं धावा दिल्या. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 226 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आरसीबीला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. फाफ डुप्लेसिस आणि मॅक्सवेल यांची झुंज अपयशी ठरली. आरसीबीला हा सामना 8 धावांनी गमवावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.