गणेश गायकवाड, प्रतिनिधी
ठाणे, 4 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हातात कोयता घेऊन गुंडांनी वृध्द महिलेच्या घरात धुडगूस घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
तुमच्या शहरातून (मुंबई)
डोंबिवलीच्या देसले पाडा भागात काही गुंडांनी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून कोयत्याच्या धाक दाखवत धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुंडांच्या दहशतीमुळे इथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
बेबी देसले या वृद्ध महिला आजारी पतीसह देसले पाडा भागात राहतात. त्याच्या घराबाहेर अचानक जितू निषाद आणि त्याचे चार साथीदार येऊन शिवीगाळ करून तुमचा मुलगा कुठे आहे? असे बोलत कोयत्याने घराच्या दरवाजावर जोरदार प्रहार केला.
या हल्ल्यामुळे घाबरलेल्या बेबी देसले यांनी मुलगा घरात नसल्याचे सांगितले. मात्र, या टोळीने जबरदस्तीने दरवाजा उघडून घरात घुसून धिंगाणा घातला. याच दरम्यान गोंधळ एकून आजूबाजूचे नागरिक जमा झाले. यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना देखील धमकी दिली.
तसेच पोलीस ठाण्यात तक्रार करेल तर पुन्हा मारू अशी धमकी जीतू आणि त्याच्या साथीदारांनी या वृद्ध दाम्पत्याला दिली. जवळपास अर्धा ते पाऊण तासात धिंगाणा सुरू होता. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जितू आणि त्याच्यासाठी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस जितू आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
दरम्यान जितू निषाद विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, लवकरच जितू आणि त्याच्या साथीदारांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मानपाडा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.