मुंबई, 5 मे : आयपीएल 2023 मध्ये 48 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात गुजरातने राजस्थानचा पराभव केला आहे. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला असून आयपीएलमधील सातव्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये अभेद्य आघाडी घेतली आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना राजस्थान येथील स्वामी मानसिंह इंदूर स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला टॉस जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी गुजरातच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. या सामन्यात राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने 14, संजू सॅमसनने 30, देवदत्त पद्दीकलने 12 तर ट्रेंट बोल्टने 15 धावा केल्या, मात्र इतर कोणत्याही फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
गुजरतच्या गोलंदाजांमध्ये राशिद खानने 3, नूर अहमदने 2 तर शमी, हार्दिक पांड्या आणि जोशुआ लिटलने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या. गुजरातच्या गोलंदाजांनी 17.5 ओव्हरमध्येच राजस्थानच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 118 धावांवर रोखले. विजयासाठी 119 धावांचे आव्हान मिळाले असताना गुजरातकडून शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांची जोडी मैदानात आली. मात्र दहाव्या ओव्हरमध्ये शुभमन गिलची विकेट घेण्यात राजस्थानच्या गोलंदाजांना यश आले. रिद्धिमान साहाने 41, शुभमन गिलने 36 तर हार्दिक पांड्याने 39 धावांची कामगिरी करून संघाचे विजयाचे आव्हान पूर्ण केले. गुजरातने विजयाचे आव्हान केवळ 1 विकेट गमावून 13.5ओव्हरमध्येच पूर्ण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.