स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 4 मे: महाराष्ट्राच्या लाल मातीत अनेक दिग्गज मल्ल तयार झाले. हे मल्ल घडण्यात कुटुंबीयांचा पाठिंबा आणि वस्तादांचे परिश्रम महत्त्वाचे ठरतात. काही कुस्ती शौकीन आपल्या मुलांना तगडा मल्ल बनवण्यासाठी वाटेल ते कष्ट उपसतात. अगदी आमिर खानच्या दंगल चित्रपटातील कथा वाटावी अशीच घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी वांगीच्या होनमाने बंधूंनी थेट घरातच तालीम सुरू केली. विशेष म्हणजे 4 मुलांपासून सुरू झालेल्या या तालमीत आता गावातील 30 ते 35 मुलं आणि मुली प्रशिक्षण घेत आहेत.
कोरोना काळात सुरू केली तालीम
तुमच्या शहरातून (सांगली)
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला. त्यामुळे अनेक मुलं खेळण्या-बागडण्याच्या वयात मोबाईलमध्ये गुंतून गेली. लॉकडाऊनमुळं बाहेर पडणं शक्य नव्हतं. या काळात मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी वांगीतील रामचंद्र आणि राहुल होनमाने या बंधूंनी थेट घरातच तालीम सुरू केली. जुन्या घरात लाल माती टाकून घेतली. 20 फूट लांब आणि 14 फूट रुंदीचा आखाडा तयार केला आणि मुलांना कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली.
शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी नेमले वस्ताद
होनमाने बंधूंनी स्वत:च्या 4 मुलांना कुस्तीचे धडे देण्यासाठी तालीम सुरू केली. पण त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी अमोल पवार या अनुभवी वस्तादांची नेमणूक केली. आता या तालमीत होनमाने यांच्या 4 मुलांसोबत गावातील 30 ते 35 मुलं-मली प्रशिक्षण घेत आहेत. अमोल पवार हे कुस्तीतील विविध डाव, प्रतिडाव या मुलांना शिकवत आहेत. त्यामुळे गावोगावच्या मैदानांत या तालमीतील पैलवानांचा दबदबा आहे.
मुलीही घेतायंत कुस्तीचे धडे
होनमाने यांनी सुरू केलेल्या तालमीत केवळ मुलंच नाही तर मुलीही कुस्तीचे डाव-प्रतिडाव शिकत आहेत. विशेष म्हणजे येथील मुली मुलांसोबत कुस्ती धरून त्यांनाही आस्मान दाखवतात. त्यामुळे वांगी गावातील मुलींमधूनही भविष्यात दिग्गज मल्ल घडणार आहेत. त्यासाठी आपले प्रयत्न असल्याचे होनमाने बंधू आणि वस्ताद अमोल पवार सांगतात.
एक थार, दोन विजेते, तिढा सुटेना, सांगलीच्या पैलवान पाटलांनी घेतला कौतुकास्पद निर्णय
माती व मॅटवर दिले जाते प्रशिक्षण
होनमाने यांनी सुरुवातीला जुन्या घरात लाल माती टाकून आखाडा तयार केला. तिथेच प्रशिक्षण दिले जात होते. परंतु, काळानुसार मॅटवरही प्रशिक्षण देण्याची गरज होती. त्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांच्या खर्चातून तालमीसाठी मॅट आणले. हे मॅट 25 फूट लांब आणि 25 फूट रुंद आहे. त्यामुळे आता वांगीतील मुला-मुलींना आता गावातच मॅटवर कुस्तीचे धडे गिरवण्याची संधी मिळाली आहे.
वांगीला कुस्तीची परंपरा
कडेगाव तालुक्यातील वांगी गावाला पूर्वापार कुस्तीची परंपरा आहे. परंतु, गेल्या काही काळात ही परंपरा लोप पावत असल्याची चिन्हे होती. पूर्वी घराघरात पैलवान होते. परंतु, अलिकडे पैलवानाच्या खुराकाचा खर्च, महागाई आणि इतर कारणांमुळे पैलवान होण्याकडे तरुणांचा कल कमी झाला होता. पण होनमाने यांच्या तालमीमुळे जणू वांगीतील कुस्ती पुनर्जिवित झाली आहे. पारंपरिक खेळ असणाऱ्या कुस्तीकडे गावातील मुलं-मुली मोठ्या संख्येने वळत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.