मुंबई, 2 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्याही यावर प्रतिक्रिया येत आहेत. ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार यांच्यासारखा राजकारणातून कधीच निवृत्त होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आधारस्तंभ सध्या पदावरुन निवृत्त झालेला आहे. त्यांनी राजकारण संन्यास घेतला नाही. पक्षांतर्गत विषय आहे. देशाला व राज्याला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पदावरून निवृत्त होणे म्हणजे राजकारणातून दूर होणे नाही. अचानक घडामोडी खळबळजनक असली तरी अनपेक्षित नाही. कुठल्या परिस्थितीत आणि का निर्णय घेतला त्यांनाच माहिती. बाळासाहेबांनीच असाचा राजीनामा दिला होता, पण त्यांना तो परत घ्यावा लागला होता. आज त्यांच्याच पक्षाच्या बैठका सुरू आहेत. अशावेळी इतर पक्षांनी व्यत्यय आणणे योग्य नाही. मविआवर परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्व शरद पवारच करतायत. मोकळे असतील तेव्हा त्यांना भेटू. याची कुणकुण कदाचित सुप्रिया सुळे व प्रतिभाताईंनाही नसावी. पण हे अनपेक्षित नव्हते. ते गौप्यस्फोट नव्हे तर ते उघड आहे. पवार थोडे निवांत झाल्यानंतर आम्ही भेट घेऊ अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पुढचा अध्यक्ष कोण?
पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.
वाचा – Sharad Pawar : युवक काँग्रेस अध्यक्ष ते राष्ट्रवादी अध्यक्ष, शरद पवारांचा राजकीय प्रवास
तर, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना सुनावताना म्हटलं की, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.