शिवसेनेचे कामगार नेते रघूनाथ कुचिक यांनी एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी शिवसेना नेत्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. या प्रकरणात रोज वेगवेगळे खुलासे होत आहे.
पीडित तरुणी २ दिवसानंतर गोव्यात सापडली आहे. ती जिवंत असल्याचा दिलासा असला तरी या प्रकरणातून आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आता रघूनाथ कुचिक आणि पीडित तरुणीमध्ये झालेली चॅट समोर आली आहे.
रघुनाथ कुचिक शिवसेनेच्या कामगार सेनेचा जबाबदार पदाधिकारी आहे. त्यामुळे रघुनाथ अनेकदा चर्चेत येत असतो. असे असतानाच एका तरुणीने रघुनाथ कुचिकवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
पुण्यातील अनेक रुग्णालयात या तरुणीला नेण्यात आले होते. ५ जानेवारी २०२२ ला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात या पीडितेची सोनोग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले होते. तसेच पीडितेला हे बाळ ठेवायचे होते. मात्र त्यांना तिचा मातृत्वाचा हक्क हिरावून घ्यायचा होता.
पुण्यातीलच कोळेकर हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, ऍपल हॉस्पिटल आणि मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पीडितेला रघूनाथचे मित्र फिरवत होते. राहूल गोयल, राहूल बोहरा, प्रवीण साळवी, सतीश दादर हे चौघे तिला रुग्णालयात घेऊन जात होते. तसेच तिला यावरुन रघूनाथकडून धमक्याही दिल्या जात होत्या.
त्यानंतर पीडितेनं फोन घेणं बंद केलं होतं. त्यानंतर रघूनाथने तिला मेसेज करण्यास सुरुवात केली. तु मरणार होतीस ना, काय झालं, मी तुझ्या सुसाईड वाट बघत होतो तुझ्या सुसाईड न्युजची, एकदाचं करुन टाकायचं होतं ना, तु म्हणली तसा मी पण मोकळा झालो असतो ना, असे मेसेज रघुनाथने केले होते.