अहमदाबाद 22 मे : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांची विक्री करणाऱ्या मानवी तस्करी रॅकेट प्रकरणाच्या तपासात धक्कादायक खुलासे झाले आहेत. गेल्या आठ वर्षांत एका मुलीची 30 ते 45 वयोगटातील 15 पुरुषांना लग्नासाठी विक्री केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीकडून दोन लाख ते अडीच लाख रुपयांमध्ये मुलींची विक्री केली जात असे. पीडितांची संख्या आठपेक्षा जास्त असू शकते.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की निशा (नाव बदलले आहे) ही 13 वर्षांची मुलगी, गुजरातमध्ये आठ वर्षांत 15 पुरुषांना वधू म्हणून विकली गेली. या रॅकेटचा कथित सूत्रधार अशोक पटेल आणि त्याच्या गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील साथीदारांनी निशाचा वापर करून ती राहत असलेल्या ठिकाणाहून सुमारे 15 मुलींचे अपहरण करून त्यांची विक्री केली.
12 वर्षाच्या चिमुकलीचं 45 वर्षीय व्यक्तीसोबत ठरलं लग्न; विवाह सुरू असतानाच कहाणीत मोठं वळण
पोलीस आता निशाच्या शोधात आहेत, जी या टोळीतील पहिल्या पीडितांपैकी एक आहे, जिने आरोपींविरुद्ध जबाब दिला आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील कानभा गावातून 11 मे रोजी बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा तपासकर्त्यांनी शोध घेतला तेव्हा या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
13 मे रोजी गांधीनगरजवळील बोरू गावातून मुलीची सुटका करण्यात आली तेव्हा पोलिसांना मानवी तस्करी रॅकेटचा कथित सूत्रधार अशोक पटेल, त्याची 45 वर्षीय पत्नी रेणुका, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा आणि रुपल मेकवान नावाची महिला सापडली. तो शहरातील ओढव भागातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्यांचे साथीदार मोती सेनमा (५०) रा. मानसा, अमृतजी ठाकोर (७०) आणि चेहरसिंग सोलंकी (३४) पालनपूर यांनाही पकडलं.
या टोळीने कथितरित्या तस्करी केलेल्या अल्पवयीन मुलींपैकी सात मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही, परंतु पोलिसांना वाटत आहे की ही संख्या यापेक्षा जास्त असू शकते. एका कानभा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अशोक पटेलने अहमदाबादमधून निशाचे अपहरण केले होते. तिने जेव्हापर्यंत त्यांनी सांगितलेलं काम करण्यास होकार दिला नाही, तोपर्यंत त्यांनी तिच्यावर बलात्कार आणि अत्याचार केला. तो आणि टोळीतील इतर सदस्य निशाला वधू म्हणून विकत असे. 2015 पासून तिला दरवर्षी तिला 30 ते 45 वयोगटातील किमान दोन लोकांशी लग्न करण्यास भाग पाडलं जात होतं. अशोक आणि त्याचे साथीदार निशाचा वापर करून इतर मुलींचे अपहरण करायचे. तिच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नव्हता. एका पोलीस सूत्राने सांगितले की, “अशोक महाराष्ट्र आणि राजस्थानमधील मानवी तस्करांच्या संपर्कात होता आणि या संदर्भातही चौकशी सुरू आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.