मुंबई, 20 मे : आयपीएल 2023 मध्ये 67 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला होता. यासामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर 77 धावांनी पराभव केला. यासोबतच चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणारा संघ ठरला आहे.
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईस सुपरकिंग्सने फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 3 विकेट घालवून 223 धावा केल्या. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड आणि कॉनवे या सलामी जोडीने 141 धावांची भागीदारी केली आणि अखेर 15 व्या ओव्हरमध्ये चेन्नईची पहिली विकेट पडली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 79, कॉनवेने 87 , शिवम दुबे 22, रवींद्र जडेजा 20 तर एम एस धोनीने 5 धावा केल्या. तर दिल्लीच्या गोलंदाजांपैकी नॉर्टेज, खलील अहमद आणि चेतन साकारिया या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
चेन्नईकडून दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी 224 धावांचे आव्हान मिळाले होते. परंतु दिल्ली कॅपिटल्स हे आव्हान पार करण्यास अयशस्वी ठरले आणि त्याने 20 ओव्हरमध्ये केवळ 146 धावा करून 9 विकेट्स गमावल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 86, यश दुलने 13 तर अक्षर पटेलने 15 धावा केल्या, इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. अखेर चेन्नई सुपरकिंग्सचा77 धावांनी विजय झाला.
चेन्नई सुपरकिंग्सची प्लेऑफमध्ये धडक :
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धचा सामना जिंकल्यामुळे चेन्नईचा संघ थेट आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. चेन्नई पूर्वी गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जाण्याचा मान मिळवला होता. चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएलमध्ये 14 पैकी 8 सामने जिंकले असून यातून 17 पॉईंट्स कमावले आहेत. यासह आयपीएलच्या पॉईंट टेबलमध्ये चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात धोनीची चेन्नई सुपरकिंग्स सर्वाधिकवेळा प्लेऑफमध्ये पोहोचणारा संघ ठरला आहे. आतापर्यंत सीएसकेने आयपीएलचे 14 सीजन खेळले असून यापैकी 12 सीजनमध्ये ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले आहेत. यासोबतच त्यांनी तब्बल 9 वेळा आयपीएलची फायनल खेळली आहे. तर यापैकी 4 वेळा त्यांनी आयपीएलचे विजेतेपद देखील पटकावले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.