मुंबई 04 मे : भारतात अनेक प्रजातीचे साप आढळतात. यातील काही बिनविषारी असतात तर काही अतिशय विषारी असतात. यातील काही सापांच्या दंशामुळे माणसाचा जीवही जातो. सध्या अशीच एक हृदय पिळवटणारी घटना तुर्भे एमआयडीसी येथून समोर आली आहे. यात सर्पदंशामुळे एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मानव दीपक गावडे असं या मुलाचं नाव आहे.
तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गाव परिसरातील काही लहान मुलं सोमवारी दुपारच्या वेळी बाहेर खेळत होती. यावेळी मानव दोन रुपयांचं नाणं एका बिळातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी दगडाच्या भिंतीत लपून बसलेल्या नागाने या मुलाच्या हाताला चावा घेतला. खेळण्याच्या नादात मानवने याबाबत कोणाला लवकर माहितीही दिली नाही. मात्र सायंकाळी त्याला अत्यवस्थ वाटू लागलं आणि तो घरी परत आला.
तुमच्या शहरातून (मुंबई)
घरच्यांनी विचारणा केली असता, त्याने आपल्या हाताला काहीतरी चावलं असल्याचं सांगितलं . यानंतर मानवची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला वाशीतील मनपा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तोपर्यंत मानवचा जीव गेला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. उपचारास उशीर झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान साप चावून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतानाच वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेचे सर्पमित्र दीपक गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने, तसंच पावसाळा जवळ आल्याने साप अन्न शोधण्यासाठी बाहेर पडतात. ते अडचणीच्या ठिकाणी लपून बसतात. साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून जळाऊ लाकडे घरापासून दूर ठेवावी, उंदराचे बिळ बंद करावे, उंदीर घरात येऊ नये म्हणून शिळे अन्न जवळच्या कचरा कुंडीत टाकावे, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावं, असा सल्ला त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.