भागेश्री प्रधान – आचार्य, प्रतिनिधी
डोंबिवली, 17 मे : माहेरच्या परिस्थितीशी दोन हात करताना तिचे शिक्षणाचे स्वप्न तिला अर्धवट सोडावे लागले. परिस्थितीशी झुंझताना तिच्या घरच्यांनी आणि तिने लवकरच लग्न बंधनात अडकण्याचे ठरवले. सुखी संसाराचे स्वप्न रंगवत ती बोहल्यावर चढली. त्यानंतर संसार सुरू झाला. दोघांचाही सुखाने संसार सुरू होता. लग्नानंतर सह संसार वेलीवर फुल येणार अशी आनंदाची बातमी देखील आली. मात्र हा आनंद फार काळ तिला टिकवता आला नाही आणि 3 महिन्यांची गरोदर असतानाच तिचे पती हृदय विकाराच्या झटक्याने निधन पावले. मात्र मोहिनी भारमल खचली नाही. तिच्या जिद्द आणि मेहनतीमुळे तिची मुंबई अग्निशमन दलात कर्मचारी म्हणून निवड झाली आहे. तिची ही संघर्षमय कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.
परिस्थिती बिकट होती
तुमच्या शहरातून (मुंबई)
मूळची पालघरची असणारी मोहिनी भारमल लग्न झाल्यानंतर मुलुंड येथे राहायला आली. त्यानंतर तिने संसाराला सुरुवात केली. मात्र 3 महिन्यांची गरोदर असताना तिच्या पतीचे निधन झाले. मात्र आपल्या पोटातील मूल वाढवायचा निर्णय तिने आणि तिच्या सासूबाईंनी घेतला. मात्र परिस्थिती बिकट होती. बाळ झाल्यानंतर त्याच्या संगोपनासाठी आणि घर खर्चासाठी मोहिनिने धुणी भांडीची कामे करायचे ठरवले.
याच दरम्यान तिच्या मैत्रिणीने तिला ठाण्यातील जिजाऊ संस्थे संदर्भात सांगत तिथे पोलीस भरतीचे प्रशिक्षण देत असल्याचे सांगितले. तिने अर्ज भरून अभ्यासाला सुरुवात केली. मात्र पती गेल्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. आता तिच्या पदरात एक बाळ आणि सासूबाई यांची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. त्यामुळे धुणी भांडी करत मुलाला सांभाळून जिजाऊचे प्रशिक्षण घेणे तीला कठीण होत होते. क्लासेस बुडत होते. त्यावेळी जिजाऊ मध्ये शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांच्या लक्षात आले. तिला विचारले असता घरची व्यथा तिने मांडली.
जिजाऊने दिले पंखांना बळ
ही सर्व व्यथा ऐकल्यानंतर जिजाऊ या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने तिचा खर्च करण्याचे ठरवले. तिला त्यांनी धुणी भांडी सोडण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी तिला तिचे घर चालवायला पैसे देखील दिले. त्यानंतर तिच्याकडून ठाणे येथील कोपरी मैदान आणि पालघर जवळील झडपोली येथील मैदानात धावणे, लांब उडी, शिडी चढणे, गोळा फेक अशा खेळांचा सराव करून घेतला. त्यानंतर अग्निशमन दलाची परीक्षा पास व्हावी यासाठी अभ्यास देखील करून घेतला. त्यानंतर ज्यावेळी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाची जागा निघाल्या त्यावेळी तेथे अर्ज केला. या परीक्षेत ती उत्तीर्ण झाली आणि मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात ती लवकरच कर्मचारी म्हणून रुजू होईल.
उंची 3 फूट अन् वय 22 वर्ष, मधुमेहाचे इंजेक्शन ठेवतो मडक्यात, देवेंद्रला हवा मदतीचा हात
सासूबाईंनी दिली मोठी साथ
आई वडील आणि सासूबाईंनी मला खूप मोठी साथ दिली. माझे पती वारल्यानंतर त्या माझ्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या. ज्यावेळी मी धुण्या भांड्यांची कामे सोडली त्यावेळी खर तर घरात खूप आर्थिक अडचण होती. मात्र सासूबाई आणि जिजाऊ संस्थेने मला आधार दिला, असं मोहिनी भारमल हिने सांगितले.
सासूबाई पाठीशी भक्कम
अनेक घरात आपण सासू सुनेची भांडण होत असल्याचे ऐकले आहे. मात्र मोहिनीच्या सासूबाई तिच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिल्या. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने तिचे ध्येय गाठले. जिजाऊ या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेमुळे आज एका हिरकणीने आयुष्याचा कठीण कडा झरझर सर केला आहे.
अक्षर असं की मोत्यासारखं, पण आयुष्य झालं खडतर, एका जादूगाराची संघर्ष कहाणी
जिजाऊचा उद्देश निराधार विद्यार्थ्यांना प्रगत करणे
जिजाऊ ही सामाजिक आणि शैक्षणिक संस्था असून या संस्थेचा मूळ उद्देश निराधार आणि गरीब विद्यार्थ्यांना शिकवणे हा आहे. आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या प्रगतीमध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. आतापर्यंत अशी अनेक मुले घडवली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.