मुंबई, 19 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. केंद्रीय यंत्रणांचा दबाव निर्माण करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. यानंतर मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संजय राऊत यांना देखील चांगलंच फटकारलं. आमचं वकीलपत्र घेऊ नका, असं अजित पवार यांनी राऊतांना म्हटलं होतं.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत
तुमच्या शहरातून (मुंबई)
दरम्यान अजित पवार यांच्या या वक्तव्याचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मी माहाविकास आघाडीचा चौकीदार आहे. त्यामुळे माझ्यावर खापर फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होता. हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्यासोबतचा घटक पक्ष मजबूत राहावा त्याचे लचके तुटले जाऊ नये. ही जर आमची भूमिका असेल आणि तरीही कोणी आमच्यावर खापर फोडत असेल तर ही जरा गंमत असल्याचा टोला राऊत यांनी अजित पवारांना लगावला आहे.
शिंदे, फडणवीस सरकारला आव्हान
हिंमत असेल तर राज्यात निवडणुका घेऊन दाखवा असं आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी शिंदे, फडणवीस सरकारला दिलं आहे. आम्हाला सर्व्हेची गरज नाही. आम्ही विधानसभेत किमान 185 तर लोकसभेच्या 40 जागा जिंकू असा दावा राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा छत्तीसगड झारखंड ही राज्य यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी उभा राहणार नसल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.