प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे, 11 मे : आपलं घर हे इतरांपेक्षा हटके पद्धतीनं सजवावं, सर्वांच्या लक्षात राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुम्ही देखील अशी हटके पद्धतीनं सजलेलं घर पाहिलं असेल. पण, अगदी हुबेहुब किल्ल्याच्या स्वरुपातील घर तुम्ही पाहिलं आहे का? पुणे जिल्ह्यातील एका शिवप्रेमी शेतकऱ्यानं हुबेहुब ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर बांधलं आहे. त्यांनी बांधलेलं हे घर सध्या परिसरात आकर्षणाचा विषय ठरलंय.
घर नव्हे किल्लाच!
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्यातील खामगाव या गावात निलेश पंढरीनाथ जगताप या तरुणानं अगदी किल्ल्यासारखं घर बांधलंय. घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणारा चिरा जांभा दगड वापरण्यात आलाय. हा दगड पावस जिल्हा रत्नागिरी येथून आणण्यात आला आहे. घराच्या चारही बाजूंना बुरुजांचा आकार देण्यात आलाय. घराचा दरवाजा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा महाकाय आहे. त्याचबरोबर घराच्या अंगणात बाग फुलविण्यात आलीय. बाहेरील बाजूला कंदिलाच्या आकाराचे दिवे बसवण्यात आलेत. प्रवेशद्वारापाशी स्वागत कमान बांधण्यात आलीय.
घराच्या अंगणात पारंपरिक तुळशी वृंदावन बांधण्यात आले आहे. घराचे क्षेत्रफळ एकूण 2577 स्क्वेअरफूट असून या घराला अंदाजे 1 कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती निलेश यांनी दिली. घराच्या आत देवघर, सभागृह, 3 बेड रुम, किचन, स्टोअर रूम, बाथरूम एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील वास्तूप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत. किचनमध्ये धूर बाहेर जाण्यासाठी आयलॅंड चिमणी आणि अत्याधुनिक बेल कॅमेरा देखील बसवण्यात आलाय.
‘घराच्या आतील बाजूस जुन्या पारंपरिक वाड्याचा लूक देण्यात आला आहे. जे घराला आणखीनच ऐतिहासिक लूक देते. आतील भिंतीस ढोलपुरी दगड वापरण्यात आला आहे. छतावरती कौलारू बांधकाम केले आहे. कुटुंबीयांना घराच्या आतमध्ये ऊन, वारा ,पाऊस अनुभवता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. घराच्या मधोमध मोकळी जागा असून चारही बाजूने छताला उतार देण्यात आला आहे, अशी माहिती निलेश यांनी दिली.
श्रीरामानं घेतलं होतं दर्शन, सप्तश्रृंगी मंदिराचं हे रहस्य तुम्हाला माहिती आहे का? पाहा Video
किल्ल्यासारखं घर का?
‘मला लहानपणापासून किल्ले पाहण्याची आवड होती. शिवाजी महाराजांच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव आहे. त्यांच्यावरील अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. त्यामुळेच मी किल्ल्यासारखं घर बांधण्याचा निर्णय घेतला. हे घर बांधण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी लागला, असं निलेश यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.