Shinde Group : शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आज सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. एकूणच, ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातो.
विशेष म्हणजे, संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार आहे, मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.
नाशिकमधून ठाकरे गटाला अनेक मोठमोठे धक्के बसत गेले. यामध्ये दोन आमदार, एक खासदार, काही माजी खासदार आणि शहरातील 12 माजी नगरसेवक तसेच काही पदाधिकारी शिंदे गटात गेले. आगामी काळात महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकत असल्याने आता त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तातडीने तयारीला लागण्याचे ठरवले आहे. नाशिकमध्ये या संदर्भात रणसिंग फुंकून फुटीरांचा समाचार घेण्यासाठी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच नाशिक मध्ये येणार आहेत.
महाविकास आघाडीतील परभणीचे 30 नगरसेवक शिंदे गटात
तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा, पालम येथील शिवसेना ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 नगरसेवकांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करताना सध्या अनेक लोक येऊन पक्षाला जोडली जात आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील नगरसेवक आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. राज्यातील सरकार सत्तेत आल्यापासून कष्टकरी, शेतकरी कामगार आशा सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.