विशाल कुमार, प्रतिनिधी
छपरा, 22 मे : बिहारमध्ये अवैध दारू निर्मिती आणि त्याची तस्करी रोखण्यासाठी सरकारने 60 लाख किमतीचे ड्रोन खरेदी केले. या ड्रोनच्या साहाय्याने मॉनिटरिंग केले जाणार होते. मात्र ३ मे रोजी पाटणा येथून उड्डाण घेतल्यानंतर सारण जिल्ह्यातील दियारा भागात हे ड्रोन बेपत्ता झाले. दरम्यान, ड्रोन बेपत्ता झाल्यापासून उत्पादन विभागाकडून ड्रोनचा शोध घेण्यात येत आहे.
ड्रोन ज्याभागातून बेपत्ता झाले आहे, त्याच भागात रविवारीही सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. या शोध मोहिमेत 200 जवानांसह 3 ड्रोन आणि स्थानिक लोकांचा समावेश होता. दरम्यान, सखोल शोध घेऊन कर्मचाऱ्यांना यश मिळाले नाही. ड्रोनच्या शोधात छपराच्या दियारा परिसरात तासनतास राखेचा शोध घेऊनही काहीही हाती आलेली नाही.
तब्बल सात तास शोधमोहिम –
उत्पादन अधीक्षक रजनीश कुमार यांनी याबाबत माहिती दिली की, बेपत्ता ड्रोन शोधण्यासाठी 200 जवानांसह तीन ड्रोन तैनात करण्यात आले होते. छपराच्या दियारा भागात शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करून शोध मोहीम राबवण्यात आली. सुमारे सात तास चाललेल्या या शोध मोहिमेनंतरही ड्रोनचा शोध लागला नाही. ज्या ठिकाणाहून ड्रोनचा शोध घेण्यासाठी ही टीम तयार करण्यात आली होती त्या ठिकाणापासून 10 किलोमीटरच्या परिघात ड्रोन शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ड्रोनचा शोध घेण्याची मोहीम सुरूच राहणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
माहिती देणाऱ्यास बक्षीस –
उत्पादन अधीक्षक रजनीश कुमार यांनी पुढे सांगितले की, बेपत्ता ड्रोनची किंमत 60 लाख आहे. हे ड्रोन एकावेळी 100 किलोमीटरपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम होते. यात उच्च दर्जाचा कॅमेरा बसवण्यात आला आहे. हे ड्रोन पूर्णपणे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या ड्रोनचा रिसीव्हर आणि कंट्रोलर विभागाकडे असतो. तर हे ड्रोन अज्ञात ठिकाणी कोसळले आहे. ड्रोनची माहिती देणाऱ्यांना 25 हजारांचे बक्षीस यापूर्वीच जाहीर करण्यात आल्याचे उत्पादन अधीक्षकांनी सांगितले.
या ड्रोनच्या माध्यमातून दारूभट्टी दुरून शोधता येत होती. त्या आधारे कारवाई करता आली असती. मात्र, ३ मे रोजी पाटणा येथून उड्डाण केल्यानंतर छपराच्या दियारा परिसरात ड्रोन बेपत्ता झाले. हरवलेल्या ड्रोनचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. याबाबत माहिती देणाऱ्यांना योग्य बक्षीसही दिले जाणार असल्याचे रजनीश कुमार यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.