धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 15 एप्रिल : मुंबई हे अतिशय वेगवान आणि धावपळीचे शहर आहे. इथं प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर आपली कामं करत असतो. इथं अनेकजण गावातून आपली स्वप्न घेऊन येतात. मुंबईत आल्यावर प्रत्येकाला सामना करावा लागतो तो म्हणजे इथल्या लोकल ट्रेनच्या गर्दीचा. मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईची मुख्य वाहिनी मानली जाते. मात्र, याच रेल्वेतील गर्दीमुळे अनेकांना आपलं जीव गमवावा लागलाय. तर, अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलय. ज्यांना अपंगत्व आलंय त्यातले काही जण सावरले पण अनेक जण आजही जगण्याचा संघर्ष करत आहेत. त्यापैकीच एक तरुण तरण सिंग आहे.
व्यवसाय सुरू केला
तुमच्या शहरातून (मुंबई)
तरण सिंग तरुणाचा 2015 साली रेल्वेतून पडून अपघात झाला. यामध्ये त्याला 90 अपंगत्व आले. मात्र, निराश न होता या अपंगत्वावर मात करत तरणने मुंबईत जीटीबी नगरमध्ये सोया चापचा व्यवसाय सुरू केला आहे. मित्रांच्या आणि भावंडांच्या सहकार्याने त्याचा व्यवसाय सध्या व्यवस्थित सुरू आहे. त्याचा भागातील लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याच्याकडे 100 रुपयांपासून सोया चाप मिळतात. विविध फ्लेवर, विविध प्रकार या सोया चापचे इथे मिळतात.
अपघात झाला
2015 सालची घटना आहे. मी काही कामानिमित्त रेल्वेने चाललो होतो. लोकल ट्रेनला खूप गर्दी होती. अशात माझा अपघात झाला आणि मला अपंगत्व आलं. मी 90 टक्के अपंग आहे. त्यामुळे माझं संपूर्ण पुढचं आयुष्यच हे दुसऱ्यांच्या सहकार्यावर आणि मदतीवर अवलंबून आहे. थोडं फार मला ज्या काही हालचाली करायच्या असतात त्या मी माझ्या व्हीलचेअरवर बसून करतो. मात्र, मला कोणतही काम करताना खूप त्रास होतो. माझं शरीर मला साथ देत नाही. मात्र आता निराश न होता जे काही आपल्या सोबत घडलेलं आहे ते स्वीकारून परिस्थितीशी संघर्ष करत आयुष्य जगणं हा माझा निर्णय झालेला आहे, असं तरण सिंग सांगतो.
भाऊ या व्यवसायात माझा बॅक बोन
माझा अपघात झाल्या त्यानंतर पुढची काही वर्षे मी डिप्रेशनमध्ये होतो. त्यातच लॉकडाऊन लागलं आणि सर्वांचेच आयुष्य बदललं. माझा भाऊ एका ठिकाणी कामाला होता त्याचा जॉब गेला. त्यानंतरच्या मधल्या काळात छोटी छोटी कामं सुरू होती. त्याच वेळी माझ्या डोक्यात ‘चाप ऑन व्हील’ची संकल्पना आली. माझ्या भावाला या संदर्भात मी बोललो त्याला देखील माझी संकल्पना आवडली. आता माझे दोन भाऊ आणि काही मित्र यात सहकार्य करतात. माझा भाऊ या व्यवसायात माझा बॅक बोन आहे.
माझा अपघात झाल्यानंतर मी पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू शकेल फिरू शकेल यासाठी माझ्या घरच्यांनी खूप प्रयत्न केले. बरेच डॉक्टर देवदेवस्की करून झालं. मात्र, अद्याप मला काही फरक पडलेला नाही. माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी, मी पुन्हा एकदा चालू फिरू लागण्यासाठी माझ्या आईने एक व्रत ठेवलं आहे. जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत ती चप्पल घालणार नाही. अशा प्रकारच तिने व्रत ठेवलं आहे. माझ्या तब्येतीत काही फरक पडेल की नाही मला माहिती नाही. पण माझ्यावर माझ्या आईचं प्रेम हे यातून दिसून येतं, असंही तरण सिंग याने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.