Abdul Sattar : वाशिम जिल्ह्यातील एका गायरान जमिनीचं प्रकरण आणि कृषीप्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्याच्या आरोपावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे चांगलेच अडचणीत आले आहेत. यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान विरोधकांच्या या सर्व आरोपांवरून सत्तार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे हे प्रकरण ?
वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील गायरानासाठी आरक्षित असलेल्या 37 एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी राज्यभरातून 15 कोटी रुपये गोळा करण्याचे आदेश सत्तार यांनी कृषीविभागातील अधिकाऱ्यांना दिल्याचाही आरोप झाला आहे. या सर्व प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर विरोधी पक्षाकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे. एकीकडे असे आरोप होत असतांना सत्तार मात्र ‘नॉट रिचेबल’ असल्याची चर्चा होत आहे.
सत्तार यांनी दिली प्रतिक्रिया
दरम्यान, गायरान जमीन आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरून विरोधकांकडून आरोप होत असतानाच अब्दुल सत्तार हे नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र अशात अब्दुल सत्तार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी फोनवरून दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार उद्या काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवारांचे आरोप
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात होत असलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या वसुलीसाठी तिकीट छापण्यात आले आहे, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात 10 पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी 25 हजाराचे प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आले आहे. तर इतर जिल्ह्यात पाठवण्यात आलेल्या प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. सोबतच सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी पवार यांनी केली आहे.
सरकार कडक कारवाई करेल : फडणवीस
अजित पवार यांनी सभागृहात केलेल्या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहेत. सिल्लोड कृषी प्रदर्शनबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर दखल घेतली जाईल. सोबतच या संदर्भात कुठेही असे चालले असेल तर सरकार त्याच्यावर कडक कारवाई करेल, अशी माहिती देखील फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे.