राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे हे भाषण ऐकून अनेकांनी त्यावर भावूक प्रतिक्रिया दिली. नुकतंच या भाषणावर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर, विषयांवर त्यांचे मत मांडताना दिसतात. नुकतंच किरण माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
“अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो”, असे किरण माने यांनी लिहिले आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी या बंडखोर आमादारांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच तुम्हाला मी नकोय असं स्पष्टपणे सांगितल्यास मी लगेच मुख्यमंत्रीपद सोडेन, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री आजच आपण मुक्काम वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावरुन ‘मातोश्री’वर मुक्काम हलवत असल्याचंही सांगितलं.