अकोल्यात महिला दिनानिमित्ताने अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या हस्ते १०८ मातृशक्तींचा सन्मान
Akola : आज विविध क्षेत्रातील महिलांचं स्थान, पद केवळ नाममात्र असून चालणार नाही तर त्याची संख्या देखील वाढली पाहिजे. तेव्हाच कुठे स्त्री-पुरुष समानता (Gender Equality) येईल. यासाठी पुरुषांबरोबरच महिलांनी देखील पुढाकर घेणे आवश्यक आहे. अधिकाधिक क्षेत्रात असलेल्या संधी कर्तृत्व आणि ज्ञानाच्या जोरावर मिळवायला हव्यात. त्यासाठी त्यानी स्वतःला त्या योग्य बनविण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Youth Congress) सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त (International Womens Day) प्रदेश युवक काँग्रेसच्या (Maharashtra Youth Congress) वतीने अकोल्यातील (Akola) जवाहरनगर परिसरातील राजे संभाजी पार्कमध्ये शनिवारी (दि. ११) मातृशक्ती सन्मान सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांच्या उपस्थितीत १०८ मातृशक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आ. धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade), प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे (Shivraj More), प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar), महानगर काँगेस अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, प्रदेशनेते डॉ. अभय पाटील, प्रदीप वखारिया महेश गणगणे, सिद्धार्थ रुहाटिया, कपिल रावदेव, पुष्पा देशमुख, पूजा काळे, पुष्पा गुलवाडे, विभा राऊत, रेवती तवर, संगीता आत्राम आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांनी आपल्या मनोगतात आयोजकांची प्रशंसा करत अशा प्रकारच्या भावनिक कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांकरिता लकी ड्रॉ (Lucky Draw) आयोजित करण्यात आला होता, तो त्यांच्या हस्ते उघडण्यात आला. सोहळ्याची सुरुवात गणेशवंदनेने झाली. यावेळी नारीशक्तीवर आधारित नृत्य सादर करण्यात आले. सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०८ मातृशक्तींना साडीचोळी, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सागर कावरे यांनी साकारलेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक सागर कावरे यांनी, तर संचालन पल्लवी पळसपगार यांनी केले. आभार अंशुमन देशमख यांनी मानले.