मुंबई : काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.त्यानंतर आता टाटा एअरबसचा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. दरम्यान तब्बल 22 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली, तसेच आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का? असा सवालही विचारला आहे.
“खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला. ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत?” असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत
“खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहिये हे तर दिसतच आहे. आता ४ प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजिनामा देणार का?” असा सवाल विचारत उद्योगमंत्र्यांच्या राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गुजरातच्या वडोदरामध्ये भारतीय हवाई दलाच्या सी-295विमानाच्या निर्मितीसाठी हा प्रकल्प उभारला जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सी-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. टाटा एअरबस हा प्रकल्पही नागपूरच्या मिहानमधून गुजरातमध्ये हालवण्यात आला आहे. या प्रकल्पातून भारतीय हवाई दलाच्या C295 मालवाहतूक विमानांची निर्मिती केली जाणार आहे.
एअर बस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर भाजपचे नेते केशव उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार असताना या प्रकल्पासाठी फॉलोअप घेणारं एक तरी पत्र कधी लिहिलं का? सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकार आणि एअरबस यांच्यात एक करार झाला. त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली नाही. मात्र तत्कालीन मविआ सरकारने एकही पत्र लिहिलं नाही. त्यामुळे हा प्रकल्प एक वर्षापूर्वीच गुजरातला गेला होता. तेव्हा मविआने प्रयत्न का केला नाही. हा प्रकल्प गुजरातला जाण्यात मविआचं अपयश असल्याचंही उपाध्ये यांनी म्हटलं. मोठे प्रकल्प राज्यात आणणे मुख्यमंत्र्यांचं काम असतं. मात्र आमचे मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडतच नव्हते, असंही उपाध्ये यांनी म्हटलं.