Afghanistan Vs Ireland Match Washed Out T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील आजचा अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील सामना आज पावसामुळे रद्द करण्यात आला. एकही चेंडू न खेळता रद्द झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा हा सलग दुसरा सामना पावसामुळे वाहून गेला आहे. अफगाणिस्तानचे आतापर्यंत 3 सामने झाले असून त्यातील एका सामन्यात पराभव झाला आहे तर दोन सामने वॉश आऊट झाले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला एकही सामना न जिंकता 2 गुण मिळाले.
आजचा सामना वॉश आऊट झाल्याने सुपर 12 फेरीतील ग्रुप 1 मधील गुणतालिकेतील समिकरणे अजूनच क्लिष्ट झाली आहेत. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यापैकी एक सामना जिंकूनही ते गुणतालिकेत तळात आहेत. अफगाणिस्तान सरस धावगतीमुळे त्यांच्या वर पाचव्या स्थानावर आहेत. आज ग्रुप 1 मधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील हाय व्होल्टेज सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. इंग्लंड आयर्लंडकडून तर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडकडून पारभूत झाल्याने आता त्यांना विजय गरजेचा असणार आहे.
दुसरीकडे गुणतालिकेत न्यूझीलंडने एक विजय आणि एक सामना वॉश आऊट झाल्याने मिळालेला 1 गुण असे एकूण 3 गुण घेऊन गुणतालिकेत सरस धावगतीच्या आधारावर अव्वल स्थानावर आहे. तर इंग्लंडला पराभवाचा धक्का देणारे आयर्लंड देखील 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची धावगती जरी – 1.170 असली तरी तीन गुणांमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. आजच्या ऑस्ट्रेलिया – इंग्लंड सामन्यानंतर यात बदल होतील. आज यजमान ऑस्ट्रेलिया तळ सोडणार की नाही हे संध्याकाळपर्यंत निश्चित होईल.
विशेष म्हणजे अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील वॉश आऊट झालेला सामना मेलबर्न येथे खेळवण्यात येणार होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना देखील याच मेलबर्नच्या एमसीजी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यावर देखील वरूणराजाची वक्रदृष्टी पडू शकते. जर असे झाले आणि सामना एकही चेंडू न खेळवता रद्द झाला तर तर ग्रुप 1 मध्ये पहिले चार संघ तीन सामन्यानंतर तीन गुणांवर राहतील. सरस धावगतीच्या जोरावर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर तर आयर्लंड तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर राहू शकतात.