Mumbai : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी पाडवा मेळावादरम्यान माहीम (Mahim) भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी आम्ही गणपतीचं मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून महापालिकेकडून (BMC) हे बांधकाम अखेर हटविले गेले आहे.
बुधवारी रात्री निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी (मुंबई शहर) सदर बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक याठिकाणी पोहोचलं आहे. तसेच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टकडूनही (Mahim Darga Trust) प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ६०० वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही ते म्हणाले.