अहमदनगर जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार निलेश लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे.
MLA Nilesh Lanke : जर लोकप्रतिनिधी असूनही निर्णय घेऊ शकत नसेल, तर आपण लोकप्रतिनिधी राहण्यात अर्थ नाही. ही आमची लढाई आहे. आता या लढ्यात आमचा शेवट झाला तरी चालेल, परंतु आता आम्ही थांबणार नाही,‘ असा निर्धार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या तीन रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत आमदार लंके यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या वेळी माध्यमांशी बोलताना आमदार लंके यांनी भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांसह अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
यावेळी आमदार लंके म्हणाले, की आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाला जाग आलेली नाही. प्रशासनातील कोणीही जबाबदार अधिकारी आंदोलनाकडे आले नाहीत. ज्यांना अधिकार नाही, अशांशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जबाबदार कोणीतरी आले पाहिजे. आम्ही आजही ठाम आहोत, की रस्त्याचे काम प्रत्यक्षरीत्या सुरू झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे, हे मी सांगू शकत नाही.
प्रशासनाकडून दखल नाही
प्रशासनाकडून कोणी आले नाही. डॉक्टरही आमच्या तपासणीसाठी आले नाहीत. उपोषणकर्त्यांमध्ये कुणाचा रक्तदाब वाढला, कुणाला मधुमेहाचा त्रास होतो, याची तपासणी सुद्धा कोणी केली नाही. प्रशासनाच्या मनात आमचे मृतदेह उचलण्याचा विचार आहे की काय ? अशी शंका निर्माण होत असल्याचे लंके म्हणाले. या रस्त्यांच्या अपघातात आमच्या माता-भगिनी या विधवा झाल्या आहेत हे विसरून चालणार नाही, असेही आमदार लंके यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ
गुरुवारी सायंकाळी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाचे अधिकारी उपोषणस्थळी आले. त्यांनी लंके यांच्यासह उपस्थित उपोषणकर्त्यांशी झालेल्या कामाची, अर्धवट कामांची, पुलांची व कामाच्या सद्यस्थातीची चर्चा केली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने आमदार लंके यांनी हे उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.