विजय देसाई, प्रतिनिधी विरार : मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्यात येत आहेत. यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात ही जयंती साजरी केली जात आहे. आतषबाजी आणि मिरवणूक काढून अनुयायांनी ही जयंती साजरी केली. यावेळी मिरवणुकीदरम्यान भीषण दुर्घटना घडली आहे.
मुंबईजवळ लागून असलेल्या विरार परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
विरारच्या मनवेलपाडा ते कारगिल परिसरात ही रॅली मध्यरात्री काढण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच विरारचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास केला आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
झोनल डीसीपी यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रॅली संपल्यानंतर मनवेलपाडा भागातून कारगिल अनुयायी जात असताना हा संपूर्ण प्रकार घडला. रॅलीमध्ये रथावरील ध्वज विजेच्या तारेला लागला. त्यातून करंट पास झाला आणि रथ ढकलणाऱ्या लोकांना विजेचा शॉक लागला.
कागगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला . तर ४ जण जखमी झाले. त्यातील उमेश कनोजिया (१८). राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) ३ गंभीर जखमींना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अस्मित कांबळे (३२) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.
विजेच्या धक्क्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी आहेत. ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॅलीदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.