कोल्हापूर : मनसेचे युवा नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्यात राजकीय चर्चेला फाटा देत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
अमित ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मेळावा उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये घेतला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, व्यक्तिगत प्रश्नही समजून घेतले. अमित ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा राज्यभरातील प्रत्येक महाविद्यालयाबाहेर काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अपेक्षा आणि पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो आहे. राजकीय घटना-घडामोडींवर भाष्य करण्यासाठी येथे आलेलो नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याला माझे प्राधान्य असेल.
पुढे अमित ठाकरे यांनी सांगितले की, “मुंबईत १५०, तर पुणे-ठाणे व मराठवाड्यात विद्यार्थी सेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यांत हे काम सुरु आहे. विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, परीक्षांतील त्रुटीचे विषय असे अनेक प्रत्येक महाविद्यालयाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते सोडवण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखा काम करतील.”
अंबाबाई देवीचे घेतले दर्शन
दरम्यान, अमित ठाकरे यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. त्याचसोबत न्यू कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
अमित ठाकरेंनी घेतली उदयनराजेंची भेट
अमित ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येण्यापूर्वी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीत उदयनराजे यांनी स्वागत करताना आपल्या खास मित्राचा मुलगा घरी आल्याने आपलाच मुलगा घरी आल्यासारखं वाटल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच अमित यांची फॅन फॉलोईंग जोरदार असल्याचे म्हणत उदयनराजे यांनी अमित ठाकरेंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.