धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 20 एप्रिल : मुंबईत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीच असतं. या धावपळीच्या आयुष्यात पोटाची भूक भागविण्यासाठी वडापाव सगळ्यांच्या खिशाला परवडणारा पदार्थ. मुंबईचा वडापाव फक्त राज्यात आणि देशात नाही तर संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.
सर्वसामान्य मुंबईकरांचा जीव की प्राण असलेल्या वडापावनं अनेक सेलिब्रिटींनाही भूरळ घातली आहे. सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एक रेस्टॉरंट चर्चेत आहे. हे रेस्टॉरंट चर्चेत येण्याचं कारणही खास आहे. कारण, इथं ॲपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी पहिल्यांदाच मुंबईच्या वडापावची चव चाखली आहे. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितही यावेळी उपस्थित होती.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कुठं आहे रेस्टॉरंट?
ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक भारत दौऱ्यावर होते. मुंबईत आल्यावर अभिनेत्री माधुरी दीक्षितनं त्यांचं स्वागत केलं. माधुरी आणि टीम कूक यांनी एकत्र वडापाव खाल्ल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या दोघांनी वडापाव कुठं खाल्ला हे अनेकांना माहिती नाही. त्याबद्दल आम्ही तुम्हाला विशेष माहिती सांगणार आहोत.
मुंबईतील ताडदेव परिसरातील प्रसिद्ध ‘स्वाती स्नॅक’ या रेस्टॉरंट मध्ये दोघांनी वडापावचा आस्वाद घेतला आहे. ‘स्वाती स्नॅक’ सेंटर या ठिकाणी अनेक पदार्थ मिळतात. पण, यामधील वडापाव विशेष फेमस असून तो खाण्यासाठी इथं अनेकजण इथं येतात.
आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका!
एका वडापावची किंमत किती?
टीम कुक यांच्यामुळे हे रेस्टॉरट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या ठिकाणी मिळणाऱ्या एक प्लेट वडापावची किंमत 165 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर याठिकाणी पाणकी चटणी नावाचा पदार्थही प्रसिद्ध आहे. त्यांची किंमत 230 रुपये आहे. दही बटाटा पुरीची किंमत 200 रुपये, नारळी भात सोबत आंबा हळद कढी खाण्यासाठी तब्बल 380 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. या प्रकारचे एकूण 30 पेक्षा जास्त पदार्थ या ठिकाणी मिळतात.
झाकीर हुसैन, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, विशाल शेखर, कपिल देव, राहुल गांधी, राज ठाकरे, यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
मुंबईतील 5 बेस्ट ‘जुगाडी वडापाव’ माहिती आहेत का? पाहा Photos
कधी सुरू झालं रेस्टॉरंट?
‘स्वाती स्नॅक’च्या संचालिका आशा झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पन्नास वर्षांपूर्वी त्यांच्या आईनं हे रेस्टॉरंट सुरू केलं. गेल्या 40 वर्षापासून त्या स्वत: हे रेस्टॉरंट चालवत आहेत. आईने सुरुवातीला दही बटाटा पुरी, पाणी पुरी, असे पदार्थ सुरू केले होते. तर आशा यांनी वडापाव, पाणकी चटणी हे पदार्थ ग्राहकांना देण्यास सुरूवात केली. रस्त्यावर मिळणारा वडापाव आणि आमच्याकडे मिळणारा वडापाव यामध्ये फरक आहे. वडापावची स्टोरी आम्ही स्वत: तयार करतो. त्याचबरोबर वडापाव तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एकूणचं रोजच्या धावपळीत रस्त्यावर एका बाजूला उभारून किंवा चालता-चालता वडापाव खाण्याची सवय असलेल्या मुंबईकरांना वडापावचं एक पॉश रेस्टॉरंट मुंबईत आहे, हे टीम कूक यांच्या मुंबई भेटीच्या निमित्तानं सर्वांना समजलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.