काँग्रेस अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात अनेक हालचाली होताना दिसत आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट काल संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. सचिन पायलट आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
राजस्थानमध्ये रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकली नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थकांना सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. अनेक आमदारांनी आपले राजीनामे सभापती सीपी जोशी यांच्याकडे सुपूर्द केले. यावर कडकपणा दाखवत काँग्रेस हायकमांडने तीन नेत्यांना नोटीस बजावली आहे.
सचिन पायलट मंगळवारी दुपारी दिल्लीला पोहोचलो. विमानतळावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. राजस्थानमधील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करुन दिल्लीत परतलेले काँग्रेसचे पर्यवेक्षक अजय माकण आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा लेखी अहवाल सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांच्यावर रविवारी पक्षाने शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.