मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अशोक सराफ सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे.
रंगमंच, सिनेमाचा पडदा आणि टेलिव्हिजनचा स्क्रीन तिन्हींमधली त्यांची बॅटिंग आपण गेली पाच दशकं अनुभवतोय. म्हणजे आमच्या पिढीने ‘हमीदाबाईची कोठी’मधला त्यांचा रोल पाहिलेला नाही. किंबहुना त्यांचं त्या काळातलं नाटकातलं काम पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं नाही. पण, ‘व्हॅक्यूम क्लीनर’ आमची पिढी पाहतेय.
‘हमीदाबाईची कोठी’बद्दल अशोकमामांनी आमच्या चॅनलच्या ‘चॅट कॉर्नर’मध्ये सांगितलं होतं, त्या रोलने मला माझ्या आतल्या सुप्त कौशल्यांची जाणीव करुन दिली. विजयाबाई तुम्हाला हे असं कर, ते तसं कर असं कधीही सांगत नाहीत. तर, अभिनेत्याकडून त्याच्यातलं बेस्ट नेमकं काय काढून घ्यायचं हे विजयाबाईंना पक्क ठाऊक. माझ्याबाबतीत तसंच झालं.
विनोदाचं भन्नाट टायमिंग, शब्दांसोबतच चेहऱ्याने बोलत समोरच्याच्या हृदयात उतरण्याचं अफलातून कौशल्य आणि पडद्यावर किंवा रंगमंचावर एन्ट्री घेताच तो व्यापून टाकण्याची हातोटी या सर्वांची जमलेली उत्तम भट्टी म्हणजे अशोक सराफ, अर्थात असंख्य रसिकांचे लाडके ‘अशोकमामा’. हा अभिनयसम्राट आज वयाची 75 वर्ष पूर्ण करतोय.
अशा या बहुआयामी कलावंताला उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि आपल्याला तृप्त करणाऱ्या आणखी असंख्य भूमिका साकारण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.