प्रयागराज, 16 एप्रिल : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे शनिवारी संध्याकाळी माफिया आणि बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांच्या एकाच वेळी झालेल्या हत्येने संपूर्ण यूपी हादरून गेली आहे. दरम्यान, या हत्येचं नाशिक कनेक्शन आता समोर आलं आहे. अहमद भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांनी नाशिक मधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. अशरफ आणि अतिक याच्या हत्येच्या काही तासांपूर्वी अतीक अहमदचा मुलगा असद यालाही यूपी पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. मुलाच्या दफनविधीच्या काही तासांनंतर, अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली.
अतिक अहमद हत्येचे नाशिक कनेक्शन
अतिक अहमद आणि भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर तपासाला वेग आला आहे. असद एन्काऊंटर प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याचं समोर आलं आहे. अतिक आणि अशरफ हत्येनंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलीस आणि नाशिक पोलिसांनी एकत्रित ही कारवाई केली आहे. गुड्डू मुस्लिम नाशिकमध्ये आश्रयाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. हत्या होण्यापूर्वी अशरफने गुड्डू मुस्लिम असल्याचं म्हणत त्याचं नाव घेतलं होतं.
कशी घडली घटना?
दोन्ही आरोपी भावांना पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी येथे आणले असता स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही भाऊ हॉस्पिटलमध्ये जाताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहेत. अचानक अतिक अहमद याच्या डोक्याला कुणीतरी पिस्तूल लावून गोळी झाडली. अशरफला ही गोष्टी कळेपर्यंत त्याच्यावरही जोरदार फायरींग झाली. दोघेही जमीनर पडल्यानंतर दोनतीनजण त्यांच्यावर गोळीबार करत राहिले. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, प्रयागराजचे मुख्य न्यायदंडाधिकारी दिनेश गौतम यांच्या न्यायालयाने गुरुवारी अतिक आणि अशरफ यांना उमेश पाल खून प्रकरणात 13 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
कोण होता अतिक अहमद?
गेल्या काही दिवसांपासून माफिया अतिक अहमद हा चर्चेत आला होता. बसपा आमदार राजू पाल हत्येचा मुख्य साक्षीदार उमेश पालच्या हत्येनंतर यूपी पोलीस अतिक अहमदवर नजर ठेवून होते. उमेश पालचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी अतिक याला गुजरातमधील साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आलं आहे. गेल्या 43 वर्षांत अतिकवर खून, लूट, दरोडा अशा गंभीर कलमांतून 100 हून अधिक गुन्हे दाखल होते.