राज्यात सर्वत्र राज्यसभा निवडणुकीची चर्चा होताना दिसून येत आहे. राज्यसभेच्या सहा जागेसाठी सकाळी ९ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, दीड वाजेपर्यंत २७८ आमदारांचे मतदान झाले आहे. दरम्यान, बच्चू कडूंनी महाविकास आघाडीला मतदान केलं आहे. त्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं असल्याचं समोर येत आहे. बच्चू कडू यांच्याकडून ३ मते मविआला मिळाली आहेत असे समजत आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपवर आक्षेप घेतला आहे. मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी हे आक्षेप फेटाळले आहेत. त्यामुळे भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे, मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपाने नोंदवलेला आक्षेपावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पराभव दिसत असल्याने भाजपाकडून असा डाव खेळला जात असल्याचे म्हटले आहे.