बहुचर्चित राज्यसभा निवडणूक पार पडली असून यात भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकून आले आहेत. तर, शिवसेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी एक – एक उमेदवार जिंकून आले आहेत. शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपच्या धनंजय महाडिकांनी पराभव केला . यामुळे राजकीय वातवरण तापलेलं दिसून येत आहे. आरोप प्रत्यारोपाचा सामना देखील रंगलेला आपल्याला पहायला मिळतोय . अशातच, आमदार बच्चू कडू यांनी देखील यावर भाष्य केले आहे. अपक्ष आमदरांना बदनाम करून चालत नाही मोठ्या पक्षाचे सुद्धा नियोजन चुकले, अपक्ष आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सपोर्ट करणार होते त्यांच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं ते ठेवलं गेलं नाही. तसंच मोठ्या नेत्यांच पाठबळ असल्याशिवाय ते अपक्ष आमदार फुटले नसल्याचं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.
तसंच शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचा जे कौतुक केलं त्यात कौतुक करण्यासारखा प्रकार त्याठिकाणी झालेला नाही, पवारसाहेब जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीने समोर जायचे असेल असा अंदाजही आमदार बच्चू कडू यांनी लावला.
- काय म्हणाले होते शरद पवार ?
शरद पवार यांनी राज्यसभेच्या निकालावर भाष्य करताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं ते म्हणाले, ‘सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावा लागेल, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचं पवार म्हणाले होते.
त्यांच्या याच वक्तव्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की , ‘संजय राऊतांनी जे आरोप केले त्यात तथ्य असेलच ते शोधले पाहिजे, या निवडणुकीत सगळ्यांनी आपआपलं पाहण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हा पराभव झाला’ असल्याचंही ते म्हणाले.