समाजाला दिशा दाखवण्याचे काम धर्मगुरू, राज्यकर्ते, समाजकारणी, साहित्यिक, पत्रकार, कवी, विचारवंत, प्रबोधक, कीर्तनकार, कलाकार, व्याख्याते, शिक्षक इत्यादी लोकांचे असते. पण दिशा दाखवणारी मंडळीच जर अज्ञानी, अर्धज्ञानी, उथळ आणि दिशाहिन असतील तर…? आणि यावर सोने पे सुहागा म्हणून जनता या वाचाळवीरांच्या नालायकपनाचा आनंद घेत असेल तर…?
तर समजायचं आपण ‘अंधार युगात’ राहतोय. तर समजायचं इतका गर्द अंधार अंतर-बाह्य पसरलाय, की प्रकाश जणू आपल्याकडे येणारच नाही असा जाणीवपूर्वक कोंडलाय. जिथे नवनिर्मिती, ज्ञान, संवेदना, शहाणपणा आणि माणूस असण्याला काहीही किंमत नाही. ज्या समाजात चिकित्सा होत नाही, तो समाज निर्बुद्ध आणि हिंस्र भविष्य निर्माण करीत असतो. समाजाला दिशा दाखवण्याचे काम ज्यांच्याकडे आहे, असे सर्वच क्षेत्रातले लोक इतके वैचारिक खुजे आणि तोकडे आहेत, की त्यांच्या मुळे सामाजिक स्वस्थ पूर्णपणे बिघडले आहे.
साधू संताची मोठी परंपरा या देशाला लाभली. संतांनी या देशाला धर्मचिकित्सा करायला शिकवली. जे चूक आहे ते चूक आणि जे बरोबर आहे रे बरोबर, हे बेधडक बोलायला शिकवलं. संतांनी देवाच्या देवत्वावरही प्रश्न उभे केले आणि धर्माच्या धर्म तत्वावरही प्रश्न उभे केले. संतांनी कायम न्यायाची, ज्ञानाची, सत्याची आणि अहिंसेची व सामजिक शांततेची बाजू घेतली त्यासाठी वेळप्रसंगी संघर्षही केला. वारकरी, महानुभाव, लिंगायत या आणि इतर प्रबोधनकारक प्रवाहांनी वाद, संवाद आणि सुसंवाद या पद्धतीने समाजाला शहाणं केलं.
लोकांना सज्जन बनवणे, सज्जनांना साधक आणि साधकांना सुधारक बनवणे, ही पुरोगामी परंपरा आहे. पण आज स्वतःला कीर्तनकार म्हणवून घेणारे कीर्तनकार कमी आणि मनोरंजनकार, विध्वंसक म्हणून आधिक काम करतायत. यांचा उथळपणा सामाजिक स्वास्थ्य बिघडवतोय. कीर्तन परंपरेचे काही नियम आणि संकेत आहेत, ते जाणकारांनी अश्या वेळी निर्भिडपणे पुढे येऊन सांगणे आणि भूमिका घेणे गरजेचे असते, पण तसे होताना अपवाद वगळता फार काही सध्या तरी दिसत नाही.
म्हणून संत कबीर म्हणतात…
“अकाल जब पडता है अनाज का,
तो मानव मर जाता है||
अकाल जब पडता है विचारोंका
तब मानवता मर जाती है ||”
आज वैचारिकतेचा दुष्काळ वरील सर्वच क्षेत्रात व त्या क्षत्रतील लोकांच्या डोक्यात पडलेला आहे. हे वाद निर्माण करणाऱ्या लोकांना आता समाजाने थांबवलं पाहिजे. कारण नेता समाज घडवत नाही, तर समाज त्या-त्या क्षेत्रातील नेत्यांना घडवीत असतो आणि नेते हे समाजाचं प्रतिबिंब असतात. आपलं प्रतिबिंब इतकं विक्षिप्त झालेलं आहे, याचा अर्थ समाज विक्षिप्त झालाय हे समजून आपण सर्व जण व्यापक सुधारणेच्या व मोडकळीस आलेल्या समाजव्यवस्थेच्या उभारणीच्या कामाला लागूया. आपल्या आजूबाजूला कायम अंधकार, अस्वस्थता व धार्मिक उन्माद राहिला पाहिजे या साठी संघ शक्ती काम करतेय तेंव्हा समाजाने प्रकाशाच्या शोधात सर्व भेद विसरून एकत्र येऊन काम करावं लागेल.
आज ती वेळ आली आहे कारण वैचारिक व बौद्धिक खुज्या उंचीच्या लोकांनी आपलं नेतृत्व बळकवलय. त्यांच्या सावल्या मोठ्या होतायत आणि ही अंधकाराची सुरुवात आहे. अंधकार कमी करण्यासाठी आपल्याला नवी पहाट आणण्यासाठी संघर्ष करायचाय.
शेवटी नवाज देवबंदी यांच्या ओळीतून ज्याने त्याने आपला व्यापक मार्ग शोधावा…
“जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है
आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है
उसके कत्ल पर मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया
मेरे कत्ल पर आप भी चुप हैं, अगला नंबर आपका है…”
बालाजी गाडे पाटील
प्रवक्ता – महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटी
मो. नो. 9657575424