यवतमाळ, प्रतिनिधी : बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे येत्या १२ तारखेला होणाऱ्या ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी बंजारा समाजाची गर्दी उसळणार आहे, असे म्हणत या कार्यक्रमाला समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समाजाचे नेते तथा पालकमंत्री संजय राठोड, आमदार निलय नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांनी केले.
जिल्ह्यातील पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयात शुक्रवारी (दि. ३) आयोजित पूर्व तयारी सभेत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह बंजारा समाजातील मान्यवर उपस्थित होते. पोहरादेवी येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री व बंजारा समाजातील देशभरातील लोकप्रतिनिधी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूच्या पुतळ्याचे अनावरण होईल. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी व बंजारा समाजाच्या २१ मागण्या शासनासमोर मांडण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या नेत्यांनी केले.
आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी बंजारा समाजासाठी एकत्रित आहोत, असे सांगत पोहरादेवीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. या सभेला तांड्यातील नायक कारभारी, हसाबी नसाबी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह तरुण मंडळी उपस्थित होती. मंचावर बी. जी. राठोड, विजय चव्हाण, श्रीराम पवार, डी. बी. चव्हाण, बाबूसिंग आडे, बाबूसिंग जाधव उमरी, प्रा. शिवाजी राठोड, नीरज पवार, दिलीप राठोड, अवचित पवार, विठ्ठल राठोड, अनुकूल चव्हाण, अशोक जाधव, नरेंद्र जाधव खेडी, नथूसिंग चव्हाण, डॉ. मधुकर नाईक, अशोक वडते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. संजय चव्हाण यांनी केले.
मान्यवरांनी धरला लेंगी नृत्यावर ताल
डफडीच्या तालावरील लेंगी नृत्य हे बंजारा समाजाचे वैशिष्ट्य आहे. सभेच्या सुरुवातीला डफडी वाजू लागली. त्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार निलय नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांनी नृत्यात सहभागी होऊन ताल धरून नृत्य केले. त्यांच्या लेंगी नृत्यातील सहभागाने बंजारा बांधवांमध्ये आनंदाची लहर पाहायला मिळाली.