रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 15 एप्रिल: घरोघरी मातीच्या चुली हे वाक्य आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहोत. कुठल्या ना कुठल्या शुल्लक कारणावरून अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात. काही वाद विकोपाला जातात आणि दोघे विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत येतात. मात्र, महाराष्ट्र पोलीस दलाचा भरोसा सेल सुखी संसाराचा भरोसा देत आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल 135 जोडप्यांचे वाद तडजोडीने मिटवून त्यांना पुन्हा एकत्र आणले आहे.
बीडमध्ये 2019 ला भरोसा सेल सुरू
तुमच्या शहरातून (बीड)
बीड येथील पोलीस दलामध्ये 2019 साली भरोसा सेल सूरू झाला. या सेलचा मूळ उद्देश पती-पत्नीमध्ये झालेले वाद त्यांचे योग्य रीतीने समुपदेशन करून मिटवणे हा आहे. पुन्हा एकदा या जोडप्यांच्या रेशीमगाठी घट्ट करण्याचे कामच भरोसा सेल करत आहे. त्यामुळे आतापर्यंत भरोसा सेलने अनेक जोडप्यांना सुखी संसाराचा रस्ता पुन्हा एकदा मोकळा करून दिला आहे.
वादाची प्रमुख कारणे
वैवाहिक जीवनात वादाची अनेक कारणे असतात. शुल्लक कारणातून वाद वाढत जातात. समजूतदारपणाचा अभाव, हट्टी स्वभाव, सासरच्या लोकांचे पटत नाही अशी अनेक कारणे असतात. त्यातच सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या अधिक वापरासह संशयित भावना निर्माण होणे हे सुद्धा वादाचे कारण ठरत आहे. जोडीदाराबाबत संशय हे वादाचे प्रमुख कारण असल्याचे भरोसा सेल कडून सांगण्यात आले.
भरोसा सेलकडील तक्रारीची आकडेवारी
सन 2021 अखेर भरोसा सेलकडे 98 अर्ज प्रलंबित होते. तर सन 2022 मध्ये 453 तक्रारी भरोसा सेल कडे दाखल झाल्या. अशा एकूण 551 अर्जांवर वर्षभरात काम केले गेले. यातील 135 प्रकरणांची तडजोड देखील करण्यात आली. तर 242 प्रकरणे पोलीस ठाण्यांकडे वर्ग केली असून 110 प्रकरण दप्तरी दाखल आहेत. 10 प्रकरणे ही कोर्टाकडे वर्ग केली असून 54 प्रकरणे प्रलंबित आहेत.
बुलेटराजांनो सावधान! जास्त आवाज केलात तर पोलिसांचा बसेल दणका, पाहा Video
भरोसा सेलची टीम करते समुपदेशन
भरोसा सेलच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जोडप्यांचे समुपदेशन केले आहे. महीलांची तक्रारी या सेलकडे आल्यानंतर इथल्या महिला कर्मचारी त्यांची तक्रार समजून घेतात. त्यांच्या सासरच्या मंडळींना देखील बोलून त्यांची बाजूही ऐकून घेतली जाते. त्या रीतीने त्यांचे समुपदेशन करणे सुरू होते.
भरोसा सेलचे एक वेगळे पॅनल
भरोसा सेलमध्ये एक पॅनल तयार करण्यात आले आहे. यामध्ये वकील, महिला पोलीस कर्मचारी यासह एनजीओ, मानसोपचार तज्ज्ञ, असे सर्व एकत्र येऊन या भरोसा सेलसाठी काम करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.